गडचिरोली : नेहरू युवा केन्द्राचा युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय भारत सरकार, तसेच केंद्रीय रिझर्व पोलीस दलाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील 50 आदिवासी युवकांची तुकडी कोची (केरळ) येथे होणाऱ्या आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रमासाठी रवाना करण्यात आली. यानिमित्त आयोजित प्रस्थान कार्यक्रमांमध्ये खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी उपस्थिती राहून युवकांना मार्गदर्शन केले आणि हिरवी झेंडी दाखवत युवकांच्या वाहनाला रवाना केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा होते. यावेळी खा.डॉ.किरसान यांनी युवकांशी संवाद साधताना या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवांनी बाह्य जगाची माहिती मिळवावी. इतर राज्याची आदिवासी संस्कृती, कला आणि इतर सामाजिक गोष्टीची माहिती प्राप्त करून त्यातून आपला सामाजिक विकास साधण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन केले. सोबतच प्राप्त झालेल्या ज्ञानातून जिल्ह्याच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला डेप्युटी कमांडंट सुमित वर्मा, जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे, सेवानिवृत्त नायब तहसीलदार सुनील चडगुलवार, रुपेश टिकले, गौरव येनप्रेड्डीवार, अनुप कोहळे उपस्थित होते. उपस्थितांचे आभार केंद्रीय पोलीस दलाचे निरीक्षक अनंत जगदाळे यांनी मानले.
यावर्षी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली, अहेरी आणि भामरागड या तीन तालुक्यातील 450 युवक-युवती भारतातील 9 वेगवेगळ्या शहरांना भेट देणार आहेत. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आदिवासी तरुणांना भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची जाणीव करून देणे आणि त्यांना विविधतेतील एकतेची संकल्पना आत्मसात करणे, तसेच त्यांना विकासात्मक उपक्रम आणि औद्योगिक प्रगतीची जाणीव करून देणे हा आहे.