विद्यार्थीदशेत वाचायला आणि वाकायला शिका- प्रा.नरेंद्र आरेकर

विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण

कुरखेडा : मोबाईल व संगणकाच्या युगात वाचन संस्कृती लोप पावत आहे. क्रमिक अभ्यासक्रमासोबतच अवांतर वाचनाने माणूस प्रगल्भ होतो. त्यामुळे वाचन संस्कृतीचे जतन करणे काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी वाचायला आणि वाकायला शिकले पाहिजे, असे प्रतिपादन प्रा.नरेंद्र आरेकर यांनी केले.

ज्ञानवर्धिनी इन्स्टिट्युट फॉर सोशल कॉज (DISC) भामरागड व आदिवासी मुलांचे तथा मुलींचे शासकीय वसतिगृह कुरखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने कुरखेडा तालुक्यातील सर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी एकाच छताखाली विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरण सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.नितीन घाटबांधे, प्रमुख अतिथी कैलास उईके, मुलांच्या वसतिगृहाचे गृहपाल सदाशिव नरताम, अंगाराच्या मुख्याध्यापिका पुष्पलता कोकोडे, शिक्षिका ममता जुवारे, नेत्रचिकित्सा अधिकारी अनिल साळवे व मोरेश्वर खोब्रागडे यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

कुरखेडा तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना व वैचारिक रुची ठेवणाऱ्या महाविद्यालयेत्तर तरुणांकरिता बौद्धिक विचार मंच उपलब्ध करून देण्याचा पायंडा मागील वर्षापासून या स्पर्धेच्या आयोजनातून घातला गेला आहे. कार्यक्रमाची उद्दिष्टे मुलींच्या वसतिगृहाच्या गृहपाल मनिषा वऱ्हाडे यांनी स्पष्ट केली. रसंचालन आकाश तुलावी व संस्कृती पिंपळे यांनी तर पुनम रक्षा यांनी आभार मानले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नीलकंठ मोटघरे, नेहा गजभिये, सचिन मुंगनकर, देवेंद्र धोंडणे, नागराज ढोक, उमेश सयाम, लिना बारसागडे, विद्यार्थी प्रमुख गौरव नैताम, हेमराज दर्रो, प्रधान धुर्वे, ऐश्वर्या हलामी, लवनकुमार नैताम इत्यादींनी सहकार्य केले.

हे ठरले विजयाचे मानकरी

भाषण स्पर्धेत प्रथम विजेती संस्कार पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी विधी बनसोड, द्वितीय विजेती ऋतिका बनसोड, तर थोरवी विद्यालयाची विद्यार्थिनी उज्वला मडावी ही तिसरी विजेती ठरली. वादविवाद स्पर्धेत प्रथम विजेता आरजेव्ही स्कूल ऑफ स्कॉलर्स विद्यालयाचा अर्पित रंगारी, द्वितीय विधी बनसोड तर तृतीय पारितोषिकाचा मानकरी यश मानकर ठरला. गीतगायन स्पर्धेत प्रथम स्वप्निल खोब्रागडे, द्वितीय विद्याभारती महाविद्यालयाचा ओमकार गोबाडे तर तृतीय शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह कुरखेडाची विद्यार्थिनी कल्याणी उइके ठरली.