गडचिरोली : देशातील सर्व भारतीय व्यवस्थापन संस्था (आय.आय.एम.) आणि देशातील सर्वोच्च ‘ब’ श्रेणीतील संस्थांच्या स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी आयोजीत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये गडचिरोलीतील रहिवासी आणि आय.आय.एम. बंगलोरचा विद्यार्थी रितीक सतीश आयलवार याने व्दितीय क्रमांक पटकावला. त्याला प्रशस्तीपत्र आणि 2 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर झाले.
देशभरातील वास्तविक जागतिक व्यवसायांना आव्हान व त्यांना सामोरे जाण्यासाठी तांत्रिक कौशल्य आणि उद्योगविषयक आंतरदृष्टी तथा धोरणात्मक कौशल्य, या विषयावर सदर स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. यात देशातील 21 आय.आय.एम.चे विद्यार्थी व देशातील ‘ब’ श्रेणीमधील सर्वोत्तम 20 महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरीता ही स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये एकुण 10,596 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातून रितीक याने द्वितीय क्रमांक पटकावत गडचिरोलीकरांची मान उंचावली.
रितीक हा आय.आय.एम. बंगलोर मध्ये एम.बी.ए. अंतिम वर्षाचा विद्यार्थी असून तो गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांचा मुलगा आहे.