गडचिरोली : अर्ध्यापेक्षा जास्त, म्हणजे जिल्ह्यात 50 पैकी 27 संवेदनशिल परीक्षा केंद्र असताना मंगळवारी बारावीच्या परीक्षेला शांततेत सुरूवात झाली. पहिलाच पेपर इंग्रजीचा असल्याने अनेक केंद्रात प्रवेश करतानाच विद्यार्थ्यांची तपासणी केली जात होती. याशिवाय संवेदनशिल केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याने कॅापी करण्याच्या प्रकाराला बराच आळा बसल्याचे दिसून आले.
दरम्यान सर्व केंद्रांवर अधिकारीवर्गाने भेटी देऊन झाडाझडती घेतली. या तपासणीत कोणी कॅापीबहाद्दर आढळले किंवा नाही याची माहिती मात्र मिळू शकली नाही. ती माहिती प्रसार माध्यमांना न देण्याचे बोर्डाचे निर्देश असल्याचे शिक्षणाधिकारी भुसे यांनी सांगितले.
विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखांमिळून जिल्ह्यात एकूण 50 केंद्रांवर 13 हजार 424 विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. मंगळवारी सकाळी 11 वाजता इंग्रजी भाषेच्या पेपरने या परीक्षेला सुरूवात झाली. बहुतांश सर्वच केंद्रांवर विविध पथकांच्या अधिकाऱ्यांनी भेटी देऊन व्यवस्थेची पाहणी केली. ज्या ठिकाणी गैरप्रकार आढळला त्याचा अहवाल पथकांकडून थेट बोर्डाकडे दिला जाणार असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. 18 मार्च 2025 पर्यंत बारावीची परीक्षा चालणार आहे.