गडचिरोली : वडीलांचे छत्र हरवल्यानंतर एकुलता एक पूत्र म्हणून तोच कुटुंबाचा आधार होता. खासगी वाहनावर चालक म्हणून कुटुंबाला हातभार लावत त्याने पोलीस शिपाई बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. पण नियतीच्या खेळात त्याच्या आयुष्याचा दु:खद अंत होईल याची कल्पना कोणालाही नव्हती. मंगळवारी नक्षलवाद्यांशी लढताना एका गोळीने त्याचा वेध घेतला आणि वृद्ध आई, पत्नी, दोन चिमुकल्या मुली यांना उघड्यावर टाकून नियतीने त्याला सर्वांपासून हिरावून घेतले.
चामोर्शी तालुक्यातल्या अनखोडाचा सुपूत्र महेश कवडू नागुलवार (39 वर्ष) या सी-60 कमांडोला वीरमरण आले. त्याचा हा मृत्यू नागुलवार कुटुंबासाठीच नाही तर संपूर्ण गावकऱ्यांना चटका लावणारा ठरला आहे.
दक्षिण गडचिरोलीच्या दिरंगी आणि फुलणार या गावांमध्ये नक्षलवाद्यांनी तळ ठोकल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी (दि.10) अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) आणि अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) यांच्या नेतृत्वात सी-60 जवानांचे पथक आणि सीआरपीएफच्या क्युएटी पथकांनी आॅपरेशन सुरू केले होते. मंगळवारी सकाळपासून चकमक सुरू होती. पोलिसांच्या पथकांनी संयुक्त मोहिमेत घेराव घालून नक्षल्यांचा तळ उद्ध्वस्त केला, पण त्यात महेश नागुलवार यांना नक्षलवाद्यांची गोळी लागली. जखमी अवस्थेत त्यांना हेलिकॅाप्टरने गडचिरोलीत आणण्यात आले. पुढील उपचारासाठी नागपूरला नेण्याचीही तयारी होती. पण तत्पूर्वीच महेश यांनी प्राण त्यागला.
आज गावात होणार अंत्यसंस्कार
शहीद महेश नागुलवार यांच्यावर उद्या दि.12 रोजी त्यांच्या मूळ गावी अनखोडा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे. साधी राहणी आणि सुस्वभावी व्यक्तिमत्व असलेल्या महेश यांना सर्व गाव ओळखत होता. त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्काराला मोठी गर्दी जमण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
































