गडचिरोली : नक्षलवाद्यांशी लढताना छातीवर गोळी झेलून वीरमरण पत्करणाऱ्या पोलिसांच्या सी-60 पथकाचा जवान महेश नागुलवार याला अखेरचा निरोप देण्यासाठी अनखोडा गावात पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली होती. पोलीस मुख्यालयातील मानवंदनेनंतर तिरंग्यात लपेटलेला महेश यांचा मृतदेह गावात पोहोचताच नागरिकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी झुंबड केली.
जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनीही पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी शहीद कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच आमदार डॉ.मिलिंद नरोटे, पोलीस अधीक्षक निलोत्पल आणि इतर मान्यवरांनीही पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारीही यावेली उपस्थित होते. अंत्ययात्रेत नागरिकांनी शहीद महेश नागुलवार यांचा जयघोष करत ‘अमर रहे’चे नारे लावले.
दरम्यान मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संदेशाद्वारे आपली श्रद्धांजली वाहिली. नक्षलमुक्त भारताच्या अभियानात महेश नागुलवार यांनी राष्ट्रासाठी दिलेले बलिदान आम्ही कधीही विसरणार नाही. त्यांचे हे बलिदान व्यर्थ जाणार नाही, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुख्यमंत्र्यांनी कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे 2 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य आणि इतर विविध लाभ देण्याची घोषणा केली.