क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांच्या विचारांचे संवर्धन करा- डॅा.नेते

192 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम

गडचिरोली : शहीद क्रांतीवीर बाबुराव पुल्लेसुर सेडमाके यांच्या 192 व्या जयंतीनिमित्त गोंडी धर्मस्थळ, आय.टी.आय. चौक, गडचिरोली येथे बुधवारी मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गोंडवाना गोटुल बहुउद्देशीय समिती, गोंडवाना महिला बचत गट, राणी दुर्गावती महिला बचत गट आणि जागतिक गोंड सगा मांदी यांच्या संयुक्त विद्यमाने हा जयंती कार्यक्रम उत्सवरुपाने साजरा करण्यात आला.

यावेळी माजी खासदार तथा भाजपचे राष्ट्रीय महामंत्री (अनुसूचित जनजाती मोर्चा) डॉ.अशोक नेते यांच्या हस्ते विधिवत पूजन आणि झेंडावंदन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शहीद बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेचे पूजन आणि ध्वजारोहणाने करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शहीद क्रांतीवीरांना अभिवादन करत त्यांच्या बलिदानाचा गौरव केला.

संस्कृतीच्या जतनाचा संदेश- नेते

यावेळी मा.खा.नेते यांनी आदिवासी संस्कृती आणि परंपरेच्या जतनाचे महत्त्व अधोरेखित केले. शहीद बाबुराव शेडमाके यांनी संपूर्ण आयुष्य आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी समर्पित केले. त्यांच्या विचारांचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. समाजाने एकत्र येऊन आपल्या संस्कृतीचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी कटिबद्ध असले पाहिजे, असे सांगितले. यावेळी त्यांनी आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या थोर व्यक्तींची आठवण करून दिली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी वीर आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतीसाठी उभारण्यात येणाऱ्या स्मारकांचे महत्त्व अधोरेखित केले. भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचाही गौरवोल्लेख त्यांनी केला. आयटीआय चौकातील धर्मस्थळाच्या जागेचा विषय मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला प्रामुख्याने माजी आमदार डॉ.देवराव होळी, माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर पा.पोरेटी, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक चरणदास पेंदाम, प्रा.डॉ.नरेश मडावी, डॉ.निळकंठ मसराम, नंदकिशोर नैताम, अॅड.दिलीप मडावी, सदानंद ताराम, गोंडवाना गोटुल बहुउद्देशीय समितीचे अध्यक्ष सुरेश किरंगे, सचिव वसंत पेंदाम, उपाध्यक्ष गुलाब मडावी, हरिभाऊ मडावी, याशिवाय अनेक आदिवासी नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि महिला बचत गटांच्या प्रमुख सदस्यांची उपस्थिती होती.