कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयातील असुविधेमुळे नवजात बाळाचा मृत्यू

वैद्यकीय अधीक्षकांकडून सारवासारव

कुरखेडा : येथील उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी सकाळी एका प्रसुतीदरम्यान बाळाचा मृत्यू झाला. यासाठी रुग्णालयातील असुविधाच जबाबदार असल्याचा आरोप करत आझाद समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी असंतोष व्यक्त केला. या रुग्णालयात एकही कायमस्वरूपी स्रीरोग तज्ज्ञ आणि सर्जनही नसल्याची बाब पुढे आली. त्यावर वैद्यकीय अधीक्षक डॅा.ठमके यांनी सारवासारव केली, पण यामुळे उपजिल्हा रुग्णालय असतानाही पुरेशा सुविधा नसल्याचे स्पष्ट झाले.

आझाद समाज पक्षाची सध्या जिल्ह्यात जनसंवाद यात्रा सुरू आहे. यादरम्यान पक्षाचे पदाधिकारी मंगळवारी कुरखेडा येथे असताना हा प्रकार घडल्याने त्यांनी रुग्णालयात धडक दिली. या रुग्णालयातील डॉ.डोंगरवार यांची नियुक्ती कुरखेडा रुग्णालयात आहे, पण त्यांना प्रतिनियुक्तीवर गडचिरोलीला देण्यात आल्याने ते केवळ गुरुवारी उपस्थित असतात. रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ आणि सर्जन असते तर बाळाचा मृत्यू झाला नसता, असे मृत बाळाचे पालक दिव्याणी व प्रफुल्ल चवरे यांनी सांगितले.

या रुग्णालयात एकूण 7 वैद्यकीय अधिकारी आहेत, पण त्यापैकी 3 वैद्यकीय अधिकारी डेप्युटेशनवर बाहेर आहेत. सर्जन नसल्याने अनेक वेळा बाहेरून बोलविल्या जातात. पण ते वेळेवर उपलब्ध होत नाहीत.

रात्री एका पेशंटचा मोबाईल चोरी गेला असता प्रशासनाकडून सहकार्य मिळत नव्हते. आझाद समाज पक्षाने मुद्दा उचलल्याने वैद्यकीय अधीक्षकांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. परंतु यावरून रुग्णालयातील सुरक्षा नामधारी असल्याचे स्पष्ट झाले. आठवडाभरात कारभारात सुधारणा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा आझाद समाज पक्षाने दिला आहे.

यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, प्रभारी विनोद मडावी, सचिव प्रकाश बन्सोड, कुरखेडा प्रमुख सावन चिकराम, आदिवासी विकास परिषदेचे अंकुश कोकोडे, सतीश दुर्गमवार, युवा नेते राहुल कुकुडकर, रोहित कोडवते उपस्थित होते.

उपजिल्हा रुग्णालयातील समस्या

* रुग्णालयात भरती असलेले रुग्ण व सोबतच्या एका नातेवाईकाच्या जेवणाची सोय करणे अनिवार्य असते. परंतु कुरखेडा रुग्णालयातील रुग्णाच्या नातेवाईकांशी चर्चा केली असता एकाही नातेवाईकाला जेवणाची सुविधा मिळत नसल्याचे सांगण्यात आले. याची प्रशासनाकडून कोणतीही दखल आजवर घेतल्या गेली नाही.
* अधीक्षक डॉ.ठमके यांच्याशी चर्चा केली असता त्यांना व त्यांच्या एकाही कर्मचाऱ्यांना याविषयी माहिती नसल्याचे सांगितले. यावरून रुग्णालयाचे अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्यांचे कामावर किती लक्ष आहे हे स्पष्ट होते.
* भोजनात अंडी, दूध व केळी नाश्त्यात भेटायला हवी, परंतु केवळ केळी मिळतात पण दूध व अंडी मिळत नाही. यासाठी जबाबदार कोण?