कुरखेडा : तालुक्यात दोन दिवसात दुचाकींच्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जणांना प्राण गमवावे लागले, तर एकूण 8 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये अक्षय पोरेटी आणि चंद्रशेखर जुमनाके यांचा समावेश आहे. यातील एक अपघात मौशी गावाजवळ तर दुसरा कढोलीजवळ घडला.
प्राप्त माहितीनुसार, दि.27 रोजी कुरखेृडा-मौशी मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात अक्षय पोरेटी (26 वर्ष) हा जागीच ठार झाला, तर त्याच्या दुचाकीवर बसलेली पत्नी भारती आणि गौरव नैताम हे जखमी झाले. तसेच दुसऱ्या दुचाकीवरील जिया नैताम, विवेक कोडाप, दोघेही रा.मौशी तसेच विलास मडावी हे तिघे जखमी झाले. तिघेही एका दुचाकीने कुरखेडाकडे येत होते. याचवेळी विरूद्ध दिशेने येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीसोबत त्यांची जोरदार धडक झाली. या धडकेत दुचाकीचा समोरचा भाग चेंदामेंदा झाला. काही जखमींना कुरखेडाच्या उपजिल्हा रुग्णालयात तर काहींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दुसरा अपघात बुधवारी रात्री कढोली-कुरखेडा मार्गावर घडला. यात चंद्रशेखर बालाजी जुमनाके (55 वर्ष), रा.जिरेगाव हे ठार झाले, तर जयपाल मडावी, रुपेश कवडो, माणिक पेंदाम हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हे दोन्ही अपघात दुचाकींची समारोसमोर धडक झाल्याने घडले आहेत.