गडचिरोलीत नष्ट केल्या 87 गुन्ह्यांत जप्त केलेल्या दारूच्या बाटल्या

15.60 लाखांच्या बाटल्यांचा चुराडा

गडचिरोली : गडचिरोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासूनच्या 87 गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला दारूचा साठा रोड रोलर चालवून नष्ट करण्यात आला. यात देशी-विदेशी दारूच्या 15 लाख 60 हजार रुपयांचा बाटल्यांचा चुराडा करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यात दारुबंदी असताना चोरट्या मार्गाने अवैधरित्या दारुची वाहतूक केली जाते. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशानुसार संबंधितांवर नजर ठेवून वेळोवेळी कारवाया सुरूच असतात. जागेअभावी दीर्घकाळापासून प्रलंबित मुद्देमाल जतन करुन ठेवणे अडचणीचे ठरत असते. त्यामुळे गडचिरोली पोलीस स्टेशनला दाखल 87 गुन्ह्यांमधील जप्त करण्यात दारूच्या बाटल्या न्यायालय व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परवानगीने नष्ट करण्यात आल्या.

गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे, राज्य उत्पादक शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक चंदन भगत व शु.के.चौधरी यांच्यासमक्ष ही कार्यवाही करण्यात आली.

नष्ट केलेल्या दारूसाठ्यात देशी दारुच्या 90 मिली मापाच्या 14027 प्लास्टिकच्या बाटल्या, विदेशी दारुच्या 2000 मिली मापाच्या 55 प्लास्टिकच्या बाटल्या, विदेशी दारुच्या 750 मिली मापाच्या 29 काचेच्या बाटल्या, विदेशी दारुच्या 375 मिली मापाच्या 71 काचेच्या बाटल्या, विदेशी दारुच्या 180 मिली मापाच्या 709 काचेच्या बाटल्या, विदेशी दारुच्या 90 मिली मापाच्या 49 काचेच्या बाटल्या, बियरच्या 650 मिली मापाच्या 9 काचेच्या बाटल्या, बियरच्या 500 मिली मापाच्या 287 टिन कॅन याप्रमाणे एकुण 15 लाख 60 हजार 194 रुपयांचा मुद्देमाल दोन पंचासमक्ष नष्ट करण्यात आला.

आधी रोलरच्या सहाय्याने कडक व मुरमाड जागेवर मुद्देमाल पसरवून काचेच्या व प्लास्टीकच्या बाटल्यांचा चुराडा करण्यात आला. त्यानंतर चेपलेल्या आणि फुटलेल्या बाटल्यांचा खच जेसीबीच्या सहाय्याने जेसीबीच्या 15 बाय 15 फुटाच्या खोल खड्ड्यात टाकून खड्डा बुजविण्यात आला.