पोलिसांनी इशारा करताच दारूने भरलेले वाहन सोडून तस्कर पसार

चार लाखांच्या दारूसह वाहन जप्त

गडचिरोली : दारुबंदी असताना अवैधररित्या छुप्या पद्धतीने दारूची आयात करणाऱ्या एका वाहनाला पकडण्यासाठी पोलिसांनी नाकाबंदी केली. संशयित वाहन दिसताच त्याला थांबण्याचा इशारा केला, पण दारू तस्करांनी वाहन जंगलाच्या दिशेने वळवले आणि जंगलात वाहन सोडून पळ काढला. त्या वाहनातील 4 लाख 26 हजारांची दारू जप्त करण्यात आली.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा आणि चामोर्शी पोलिसांनी संयुक्तरित्या चामोर्शी ते घोट मार्गावर केली. कुनघाडा रै येथील रहिवासी गोलू मंडल हा त्याच्या साथीदारांसह एका लाल रंगाच्या एक्सयुव्ही 500 या चारचाकी वाहनातून चामोर्शी ते घोट, कृष्णनगर मार्गे देशी-विदेशी दारुची वाहतूक करणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार संयुक्तपणे नाकाबंदी करुन सापळा रचला होता. दरम्यान ते संशयित वाहन भरधाव वेगाने येताना दिसल्यावर पोलिसांनी त्या वाहनाला थांबण्याचा इशारा केला. मात्र पुढे काय होणार याची कल्पना येताच चालकाने वाहन जंगलाच्या दिशेने वळवले आणि आरोपींनी वाहन जंगलात सोडून पळ काढला.

त्या वाहनाची तपासणी केली असता त्यात 180 मिली मापाच्या टोयोटा कंपनीच्या दारूचे 15 बॉक्स (किंमत 2,16,000 रुपये), 90 मिली मापाच्या देशी दारूचे 30 बॉक्स (किंमत 2,10,000 रुपये) आणि एक एक्सयुवी 500 हे चारचाकी वाहन (क्रमांक एम एच 49 ए 5925) ज्याची किंमत अंदाजे 5 लाख रुपये आहे, असा एकूण 9 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी चामोर्शी पोलिसांनी कलम 65 (अ), 98 (2), 83 महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये आरोपी गोलू मंडल रा.कुनघाडा रै आणि एका अज्ञात वाहन चालकाविरुध्द गुन्हा नोंद केला. सदर आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून याअगोदरही त्यांच्यावर विविध पोस्टे मध्ये गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अरुण फेगडे, चामोर्शीचे पोनि.अमुल कादबाने, स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. भगतसिंग दुलत आणि पथकाने पार पाडली.