बग्गीतून मिरवणूक काढत वेतन अधीक्षक दिलीप मेश्राम यांना निरोप

आ.सुधाकर अडबाले यांची उपस्थिती

गडचिरोली : येथील शिक्षण विभाग कार्यालयाचे वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे (माध्यमिक) अधीक्षक दिलीप मेश्राम यांचा सेवानिवृत्ती सोहळा जिल्ह्यातील खासगी शाळांतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या गौरवोद्गारांनी वातावरण भारावून गेले होते. या सोहळ्याच्या वेळी मेश्राम यांची बग्गीतून मिरवणूक काढण्यात आल्याने हा सेवापूर्ती सोहळा अविस्मरणीय ठरला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दंडकारण्य शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे, तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वासुदेव भुसे, उपशिक्षणाधिकारी विवेक नाकाडे, राज्य शिक्षकेत्तर महामंडळ पुणेचे कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर, अबुझमाड शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य शमशेरखाँ पठाण, कमलताई मुनघाटे हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्मिता लडके, मुख्याध्यापिका वंदना मुनघाटे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक काचिनवार, जिल्हा कार्यवाह उदय धकाते, वैभव बारेकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी आमदार सुधाकराव अडबाले म्हणाले, मी नागपूर विभागाचा जवळपास दोन वर्षापासून शिक्षक आमदार आहे. पण मला शिक्षक कर्मचाऱ्याकरिता दिलीप मेश्राम यांना कधीच फोन किंवा पत्र देण्याची संधी त्यांनी दिली नाही. ते स्वतः सर्वांची कामे करून देत होते. त्यांच्या कार्यालयात आलेला निधी कधीच त्यांनी वापस जाऊ दिला नाही. याप्रसंगी उल्हास नरड म्हणाले, या जिल्ह्यात योग्य व्यक्तीचा अनोखा असा निरोप कार्यक्रम प्रथमच होत आहे. मान, सन्मान, निष्ठा, प्रतिष्ठा ही त्यांच्या कर्तृत्वावर निर्माण होते. याचे उदाहरण म्हणजे दिलीप मेश्राम असल्याचे ते म्हणाले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे म्हणाले, वाजतगाजत अशी बग्गीतून मिरवणूक काढून सभास्थळी आणण्याचे भाग्य कोणत्याही अधिकाऱ्याला आजपर्यंत मिळाले नाही. भविष्यात अशी संधी आम्हाला सुद्धा मिळणार नाही. मेश्राम यांनी आपल्या कामातून महाराष्ट्रात एक आदर्श निर्माण केल्याचे ते म्हणाले. यावेळी इतरही मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

कार्यक्रमाचे संचालन उदय धकाते, तर आभार प्रदर्शन संदीप भरणे यांनी केले. या कार्यक्रमासाठी नंदलाल लाडे, संघमित्रा भशारकर, रुषी वासेकर, शैलेश कापकर, अरुण धोडरे, भुपेश वैरागडे, हेमंत रामटेके आदींनी परिश्रम घेतले.