अहेरी : गेल्या वर्षभरापेक्षाही कमी कालावधीत अहेरी येथील प्राणहिता पोलीस उपमुख्यालयाला तिसरे अपर पोलीस अधीक्षक लाभले आहेत. डॅा.श्रेणीक लोढा यांच्या बदलीनंतर रिक्त असलेल्या या जागेवर सत्यसाई कार्तिक (आयपीएस) यांची नियुक्ती झाली आहे.

दक्षिण गडचिरोली भागातील अतिसंवेदनशिल भागासह राजकीय, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या दक्षिण गडचिरोलीचे पोलीस उपमुख्यालय ‘प्राणहिता’ हे अहेरी (आलापल्ली) येथे आहे. आयपीएस दर्जाचे कनिष्ठ अधिकारी या उपमुख्यालयाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळतात.
आयपीएस अधिकारी एम.रमेश यांच्याकडे अहेरी उपमु्ख्यालयाचा प्रभार होता. पण विधानसभा निवडणुकीच्या आधी डॅा.श्रेणीक लोढा यांची बदली त्या ठिकाणी झाली, तर एम.रमेश यांच्याकडे एएसपी (प्रशासन) ही जबाबदारी देण्यात आली. मात्र अवघ्या तीन महिन्यात डॅा.लोढा यांची बदली बुलडाणा येथे झाल्यानंतर पुन्हा एम.रमेश यांच्याकडे प्राणहिताचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला होता. आता तेथील जबाबदारी सत्यसाई कार्तिक या नवीन आयपीएस अधिकाऱ्याकडे देण्यात आली आहे.

































