जिल्हा परिषदेत साफसफाईला वेग, अनेक वर्षांच्या गठ्ठ्यांची पुनर्बांधणी

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी

गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व सरकारी कार्यालयांमधील स्वच्छता, प्रलंबित कामे आणि कामात सुसूत्रता आणण्यासाठी दिलेल्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याची मुदत संपण्यासाठी आता जेमतेम एक आठवडा (15 एप्रिल) उरला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत फाईलींच्या गठ्ठ्यांचे वर्गीकरण करून त्यांची पुनर्बांधणी करणे आणि मुदत संपलेल्या कागदपत्रांची विल्हेवाट लावण्याच्या कामाला गती आली आहे. मार्च अखेरची लगबग संपल्यानंतर सर्व विभागांमध्ये हे काम यु्द्धपातळीवर सुरू आहे.

नव्याने मु्ख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर फडणवीस यांनी 100 दिवसांचा कृती आराखडा देऊन सर्व सरकारी कार्यालयांना कामाला लावले होते. गडचिरोली जिल्हा परिषदेने सर्व पंचायत समित्यांसह ग्रामपंचायतींनीही या कार्यक्रमाची पूर्णपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी दिले होते. त्यात कार्यालयीन स्वच्छतेसोबत संग्रही ठेवायच्या कागदपत्रांचे वर्गीकरण करणे, अधिकाऱ्यांच्या क्षेत्रीय भेटीतून कार्यालयातील भौतिक सुविधांचा आढावा, नागरिकांसाठी अधिकाऱ्यांना भेटण्याची वेळ ठळकपणे नमूद करणारे फलक लावणे, तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून आरोग्य विभागाकडून सर्व संशयित नागरिकांनी कॅन्सर आणि टिबी तपासणी सुरू आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून हातपंपांच्या दुरूस्तीचा कार्यक्रमही हाती घेण्यात आला असल्याचे सीईओ गाडे यांनी सांगितले.

100 दिवसांच्या कृती आराखड्यात कार्यालयीन स्वच्छतेला प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे. यातून कार्यालयांचे बदललेले स्वरूप दिसेल, असा विश्वास सीईओ सुहास गाडे यांनी व्यक्त केला.