
गडचिरोली : समाजातील जाती-धर्मातील अंतर कमी करण्यासाठी आणि आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत विशेष प्रोत्साहन अनुदान देण्याची योजना राबविली जाते. याअंतर्गत 2024-25 या आर्थिक वर्षात 2 कोटी 25 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. आंतरजातीय विवाह करणाऱ्या 450 जोडप्यांना प्रत्येकी 50 हजार रुपये याप्रमाणे तो निधी वाटण्यात आला.
समाजातील अस्पृश्यता निवारण आणि जातीभेद निर्मूलनासाठी शासनाच्या वतीने आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रत्येकी 50 हजार रुपये अर्थसहाय्य देण्याची योजना आहे. या योजनेत 50 टक्के हिस्सा केंद्राचा तर 50 टक्के हिस्सा राज्य शासनाचा असतो. सन 2021-22 पासून या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्षात लाभ मिळालेला नव्हता.
नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात केंद्र आणि राज्याचा मिळून 2 कोटी 25 हजार रुपये निधी प्राप्त झाला होता. त्यातून जुन्या प्रलंबित आणि गेल्यावर्षीच्या पात्र लाभार्थ्यांना मिळून एकूण 450 जोडप्यांना प्रत्येकी 50 हजार प्रोत्साहन अनुदानाचा लाभ देण्यात आल्याचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी चेतन हिवंत यांनी सांगितले.