कमलापूर ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेस धर्मरावबाबा गटाचे वर्चस्व

रजनिता मडावी दुसऱ्यांदा झाल्या सरपंच

अहेरी : तालुक्यातील कमलापूरच्या सरपंचपदासाठी दि.8 ला (मंगळवारी) निवडणूक पार पडली. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) आणि आ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या समर्थक रजनिता मडावी यांना दुसऱ्यांदा सरपंचपदी विराजमान होण्याची संधी मिळाली.

तत्कालीन सरपंच व उपसरपंचांना न्यायालयाने अपात्र घोषित केल्याने नायब तहसीलदार एम.सी.दाते यांनी कमलापूर ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदाची निवडणूक घेतली. एकूण नऊ सदस्य असलेल्या कमलापूर ग्रामपंचायत मध्ये दोन सदस्य अपात्र, तर एक सदस्य मरण पावले आहेत. त्यामुळे सहा सदस्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला.

सरपंचपदासाठी रजनिता मडावी व इंदू पेंदाम यांनी नामनिर्देशन भरले होते. त्यात रजनिता मडावी यांना चार, तर इंदू पेंदाम यांना दोन मते मिळाली. नायब तहसीलदार एम.सी.दाते यांनी रजनिता मडावी यांना विजयी घोषित केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी यासाठी खेळी खेळल्याचे बोलले जाते. त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते रामेश्वरबाबा आत्राम यांनी पुढाकार घेत पक्षाचा झेंडा कमलापूर ग्रामपंचायतीवर फडकवला.

यावेळी सिनेट सदस्य व राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांनी नवनियुक्त सरपंच रजनिता मडावी यांचे अभिनंदन केले. यावेळी सांभया करपेत, व्यंकटरावपेठाचे उपसरपंच किशोर करमे, माजी सरपंच मलाया साकटी, सुदीप रंगूवार, संतोष बोमावार, दिनेश अरगेली, संजीव चकनिलवार, इरशाद शेख, बापू कुडमेथे, सुदीप रंगुवार, चंदू आत्राम, विनोद कुसराम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.