गडचिरोली : जिल्ह्यातील धान खरेदी, साठवणूक आणि प्रक्रियेमध्ये झालेल्या विविध अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहारांवर जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या दोन महिन्यांत यासंदर्भात अनेक कारवाया करण्यात आल्या आहेत. यात अहेरी, सिरोंचासह कुरखेडा तालुक्यातील देऊळगाव खरेदी केंद्रावरील घोटाळ्याप्रकरणी अपहाराच्या रकमेची वसुली करून दोषींवर फौजदारी कारवाया करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
अहेरी येथील शासकीय धान्य गोदामातील अपहारप्रकरणी गोदाम व्यवस्थापक आणि रक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. 22.42 लाखांची वसुलीही सुरू आहे. या प्रकरणी सहा अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू आहे. तसेच ट्रान्सपोर्टरलाही नोटीस बजावण्यात आली आहे.
सिरोंचा येथील 2011 सालच्या धान्य अपहारप्रकरणी 24.8 लाखांच्या वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी 10 अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे.
तसेच, आदिवासी विविध कार्यकारी विकास संस्था देऊळगाव (ता.कुरखेडा) येथे 2023-24 मध्ये 3900 क्विंटल तांदळाच्या अपहाराचे प्रकरण उघडकीस आले आहे. त्यात 1.53 कोटी रुपयांची वसुली आणि दोषींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील धान्य साठ्याची 100 टक्के तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. 2 एप्रिल रोजी झालेल्या पॅडी होर्डिंग कोऑर्डिनेशन कमिटीच्या बैठकीत नियमभंग करणाऱ्या राईस मिलर्सवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली असल्याचे प्रशासनाने कळविले.
2011 मधील धान्य लोडिंग प्रकरणात लादलेल्या 2.67 कोटी रुपयांच्या दंडापैकी 1.35 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. उर्वरित 72 लाख रुपयांची वसुली न करणाऱ्या 13 राईस मिलर्सच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई सुरू आहे.
धान्य खरेदी व साठवण प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा अपहार किंवा अनियमितता सहन केली जाणार नाही. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल आणि अशा प्रकारच्या प्रकारांना पायबंद घातला जाईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.