गडचिरोली : गोंदिया ते बल्हारशाह या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी 4819 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मंजूर केला आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार असून मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा व आंध्र प्रदेशाशी व्यापार-व्यवसाय वाढण्यास मदत होईल, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. याशिवाय वडसा रेल्वे स्थानकाचाही स्मार्ट रेल्वे स्टेशन प्रकल्पात समावेश असून 20.5 कोटींच्या खर्चातून या स्थानकाचा कायापालट सुरू असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
शुक्रवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रपरिषदेत गडचिरोलीचे पत्रकारही व्हिडीओ कॅान्फरन्सिंगने सहभागी झाले होते.
महाराष्ट्रात रेल्वे विकासासाठी विक्रमी निधी देण्यात आला असून याद्वारे 132 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत आहे. त्यात वडसा स्थानकाचाही समावेश आहे. वडसा स्थानकाच्या विकासासाठी 20.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यावर्षी रेल्वे बजेटमधून महाराष्ट्राला 23 हजार 700 कोटी रुपये प्राप्त झाले असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
स्थानकांच्या पुनर्विकास योजनेत स्थानकांवर प्रवाशांसाठी वेटिंग लाऊंज, फूड कोर्ट्स, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एस्कलेटर्स आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच, स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाणार आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून लवकरच छत्रपती शिवाजी महाराज सर्किट सुरू होणार आहे. यामध्ये महाराजांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाचे किल्ले, सांस्कृतिक स्थळे यांचा समावेश असलेला 10 दिवसांचा टूर आयोजित केला जाणार आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.