गडचिरोली : जिल्ह्यातील वागदरा या खेड्यातील अमर ममिता रविंद्र परचाके या युवकाची आय.आय.टी. गांधीनगर या देशातील नामांकित विद्यापीठामध्ये ‘सोसायटी अँड कल्चर’ या अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. अतिशय विपरीत परिस्थितीतून अमरने मिळवलेले हे यश इतर युवा वर्गासाठी प्रेरणादायी ठरले आहे.
घरची परिस्थिती बेताची, त्यात बालवयातच आईचं छत्र गमावलेला अमर आपल्या आजी-आजोबांच्या संगोपनाखाली वाढला. चामोर्शी येथील यशोधरा विद्यालयातून त्याने शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढे नागपूर येथील डॉ.आंबेडकर कॉलेजमधून बी.ए. तर मातृसेवा संघ इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क येथून एम.एस.डब्ल्यू.चे शिक्षण घेतले.
आय.आय.टी सारख्या विद्यापीठामध्ये तांत्रिक शिक्षणासोबतच कला, विधी व इतर क्षेत्रात देखील शिक्षणाच्या संधी असतात. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थी हा माहितीच्या आभावामुळे तिथपर्यंत पोहचू शकत नाही. ‘सोसायटी अँड कल्चर’ हा अभ्यासक्रम देशातील फारच कमी विद्यापीठांमध्ये उपलब्ध आहे. या स्पर्धात्मक अभ्यासक्रमासाठी लेखी परीक्षा व मुलाखती अशा अनेक टप्प्यांतून अमरने यशस्वीपणे वाटचाल केली. या अभ्यासक्रमातून समाज, संस्कृती, विकास, मानवतावाद आणि संशोधन यांचा अभ्यास करून अमर समाजहितासाठी अधिक प्रभावीपणे काम करू इच्छितो.
कमी वयातच आलेल्या जबाबदाऱ्या, वैयक्तिक आयुष्यात असंख्य अडचणी असूनही न खचता तो सातत्याने पुढे जात राहिला. या सगळ्या संघर्षातही समाजाबद्दलची संवेदना, तळमळ आणि बांधिलकी त्याच्यात कायमच होती. आज त्याची देशातील प्रतिष्ठित विद्यापीठात झालेली निवड ही केवळ त्याच्या वैयक्तिक यशापुरती मर्यादित नसून ही बाब आदिवासी समाजातील तरुणांना प्रेरणा देणारी आहे.
या यशाबद्दल अमर म्हणतो की, आय.आय.टी मध्ये उच्च शिक्षण घेणे माझ्या साठी खूप मोठी संधी आहे. देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये ग्रामीण- आदिवासी भागातील विद्यार्थी शिक्षण घेऊन शैक्षणिक पाया मजबूत करत स्वतःच्या आणि समाजाच्या विकासासाठी योगदान द्यावे. मला ज्या प्रकारे बोधी रामटेके व इतरांचे मार्गदर्शन मिळाले त्याच प्रकारे, उच्च शिक्षणासंदर्भातील माहिती आणि मार्गदर्शन प्रत्येकापर्यंत पोहचणे गरजेचे आहे, त्यासाठी मी देखील प्रयत्नशील राहील.