भावी पिढ्यांसाठी पाणी सुरक्षित ठेवणे ही सामूहिक जबाबदारी- समीर डोंगरे

जलव्यवस्थापन पंधरवाड्याचे उद्घाटन

गडचिरोली : भावी पिढ्यांसाठी पाणी सुरक्षित ठेवण्यासाठी सामुहिक जबाबदारीतून पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन, जनजागृती आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगसारख्या उपाययोजनांची अंमलबजावणी प्राधान्याने करण्याची गरज मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त समीर डोंगरे यांनी व्यक्त केली.

जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित “जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा 2025” या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा मंगळवारी (दि.15) गडचिरोली पाटबंधारे विभागात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन समीर डोंगरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.सविता सादमवार, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव, सामाजिक कार्यकर्ते मनोहर हेपट व राहुल गुळघाने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना प्रीती हिरळकर यांनी जलसंवर्धनासाठी प्रत्येक व्यक्तीचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले. डॉ.सादमवार यांनी जलजागृतीसाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली. पाणी हा फक्त निसर्गसंपत्तीचा भाग नसून तो संस्कृतीचा आणि समाजाच्या आरोग्याचा आधार असल्याचे त्या म्हणाल्या.

कार्यकारी अभियंता राहुल मोरघडे यांनी जलसंकट टाळण्यासाठी युवकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले. त्यांनी जलप्रदूषण टाळणे, पाण्याचा पुनर्वापर करणे, घराघरात रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसवण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

प्रास्ताविक उपविभागीय अभियंता गणेश परदेशी यांनी केले. जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा 15 ते 30 एप्रिल 2025 दरम्यान जिल्हा, तालुका व गाव पातळीवर विविध उपक्रमांद्वारे राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन दीपक भांडेकर तर आभार प्रदर्शन कमलेश आखाडे यांनी केले. या कार्यक्रमाला सहायक अभियंता अमित डोंगरे, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.