गडचिरोली : लोकशाही व्यवस्था जीवंत ठेवण्यासाठी सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकही तितकेच महत्वाचे आहेत. मात्र सध्या विविध दबावतंत्राचा वापर करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातूनच काँग्रेस नेत्या खासदार सोनिया गांधी, तसेच लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यावर खोटेनाटे आरोप लावून त्यांना वारंवार नोटीस पाठवून मानसिक आणि शारीरिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो आम्ही सहन करणार नाही, असे म्हणत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरूवारी (दि.17) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली.
या आंदोलनात आ.अभिजित वंजारी, आ.सुधाकर अडबाले, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्यासह इतर पदाधिकारी सहभागी झाले होते.
सोनिया गांधी, राहुल गांधी हे देशातील गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, महिला, युवक व इतर शोषितांच्या समस्यांना घेऊन लोकसभेत व सार्वजनिक ठिकाणी आवाज उठवित आहेत. त्यामुळे घाबरलेल्या मोदी सरकारकडून काँग्रेस नेत्यांना नोटीस दिल्या जातात. त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. सत्तेचा दुरुपयोग करून विरोधकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत कॉँग्रेस पक्षाने याचा निषेध नोंदविला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींकडे निवेदन पाठवून सत्ताधाऱ्यांना लोकशाही मूल्य अबाधित राहण्याकरिता योग्य ते निर्देश व सूचना देण्याची मागणी करण्यात आली.
या आंदोलनात प्रामुख्याने प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा गडचिरोली जिल्ह्याचे निरीक्षक अॅड.सचिन नाईक, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस विश्वजित कोवासे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव पंकज गुड्डेवार, महिला जिल्हाध्यक्ष अॅड.कविता मोहरकर, शहराध्यक्ष सतीश विधाते, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, जिल्हाध्यक्ष (सहकार सेल) अब्दुल पंजवानी, जिल्हाध्यक्ष (शिक्षण विभाग) दत्तात्रय खरवडे, प्रभाकर वासेकर, जितेंद्र मुनघाटे, सुधीर बांबोळे, माजित सय्यद, भैय्याजी मुद्देमवार, नेताजी गावतुरे, चारुदत्त पोहाणे, परशुराम गेडाम, उत्तम ठाकरे, स्वप्निल बेहरे, विपुल एलटीवार, कुणाल ताजने, घनश्याम मुरवतकर, काशिनाथ भडके, मिलिंद बारसागडे, आकाश मुलकलवार, राकेश रत्नावार, संजय मेश्राम, विनोद खंडारे, सुरेश भांडेकर, अविनाश श्रीरामवार, गौरव एनप्रेड्डीवार, अरुण कुकुडकर, विठ्ठल काळे, जावेद खान, अपर्णा खेवले, कविता उराडे, सुनीता रायपुरे, पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.