भर उन्हात काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी अडविला राष्ट्रीय महामार्ग

पुरेशी वीज द्या, हत्तींचा बंदोबस्त करा

गडचिरोली : जिल्ह्यात आणि विशेषत: आरमोरी विधानसभा क्षेत्रातील गावांमध्ये रानटी हत्ती आणि वीज पुरवठ्याची समस्या शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी झाली आहे. बहुतांश नागरिकांची उपजीविका शेतीवर अवलंबून असल्याने या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठाण मांडून मंगळवारी (दि.22) आरमोरी ते गडचिरोली हा महामार्ग रोखला.

जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात व आमदार रामदास मसराम यांच्या प्रमुख उपस्थितीत देऊळगाव येथे हे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी नागपूर-गडचिरोली महामार्गवरील वाहतूक 1 तास रोखून धरली.

यावेळी मुख्य वनसंरक्षक कार्यालयाच्या वतीने विभागीय वनाधिकारी (दक्षता) गणेश पाटोळे यांनी याच पद्धतीची समस्या असलेल्या कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू भागात कशा पद्धतीने ही समस्या हाताळली जात आहे याचे प्रशिक्षण देणाऱ्या चमूला पाचारण करून नागरिकांची कार्यशाळा घेण्याचा उपाय सांगितला. तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक कारणामुळे वीजेची समस्या उद्भवत आहे ती लवकरच दूर करण्यात येईल असे सांगितले. ही समस्या लवकर दूर न केल्यास यापेक्षा मोठे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिला.

यावेळी माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन पा. नाट, महिला जिल्हाध्यक्ष कविता मोहरकर, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, वडसाचे राजेंद्र बुल्ले, कोरचीचे मनोज अग्रवाल, धानोराचे प्रशांत कोराम, गडचिरोलीचे शहराध्यक्ष सतीश विधाते, वसंत राऊत, अहेरीचे डॉ.अब्दुल निसार हकीम, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, माजी सभापती परसराम टिकले, माजी उपसभापती नितीन राऊत, जिल्हा काँग्रेसचे जेष्ठ नेते शंकरराव सालोटकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, जिल्हा उपाध्यक्ष जयंत हरडे, प्रभाकर वासेकर यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.