गडचिरोली : सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षेसह राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा निकाल मंगळवारी (दि.13) जाहीर करण्यात आला. यात सीबीएसई बोर्डाच्या दहावी परीक्षेत गडचिरोलीच्या प्लॅटिनम ज्युबिली स्कूलच्या शौर्य सुधाकर रायपुरे याने 97.20 टक्के गुण घेऊन जिल्ह्यात सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावला. याशिवाय आलापल्लीच्या ग्लोबल केरला मॅाडेल इंग्लिश मीडियम स्कूलची सुष्मित कौर चरणजितसिंह सलुजा हिने 96.80 टक्के गुण घेऊन जिल्ह्यात द्वितीय आणि मुलींमध्ये जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.

राज्य मंडळाच्या दहावी परीक्षेत गडचिरोलीच्या वसंत विद्यालयाचा आयुष सचिनकुमार ब्राह्मणवाडे याने 97.60 टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे. द्वितीय सुष्मित कौर, तर तृतीय स्थानी असलेल्या गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या समर मनोज खोबे याने 96 टक्के गुण मिळवले.
आलापल्लीसारख्या ठिकाणावरून सुष्मित कौर हिने पटकावलेले यश सर्वांच्या कौतुकाचा विषय झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते डॅा.चरणजितसिंह सलुजा यांची सुष्मित कन्या आहे. तिचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
सीबीएसईत प्लॅटिनमचा वरचष्मा
प्लॅटिनम ज्युबिली इंग्लिश मीडियम स्कूल अॅन्ड ज्युनियर कॅालेजने सीबीएसई पॅनर्टच्या दहावी-बारावी परीक्षेत 100 टक्के निकाल देत घवघवीत यश मिळविले. दहावीत प्लॅटिनमच्या 100 पैकी 21 विद्यार्थ्यांनी 90 टक्केपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. याशिवाय प्राविण्य आणि प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या 69 आहे. 90 टक्केपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्यांमध्ये शौर्य सुधाकर रायपुरे (97.20), अर्जुन आनंद मोडक (96.20), अर्जुन राजेंद्र भुयार (96.00), श्रेयश महेश कुद्रपवार (95.80), मृणाली प्रदीप गेडाम (95), याशिवाय नील नितीन हेमके, समर्थ दीपक केंद्रे, भार्गवी बासू नरोटे यांनी प्रत्येकी 94.60 टक्के गुण पटकावले आहेत.
या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना संस्थेचे सचिव अझिझ नाथानी म्हणाले, हे यश केवळ गुणांचे नसून आमच्या संस्थेच्या दूरदृष्टीचे आणि मुल्याधिष्ठित शिक्षणाचे प्रतिबिंब आहे.