शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षाचे धरणे आंदोलन

उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

गडचिरोली : अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने शेतकरी व जनतेच्या विविध मागण्यांसाठी येथील इंदिरा गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी भर उन्हात घोषणाबाजी करत शासनाचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर एका शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी यांची भेट घेऊन त्यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाने लिहिलेले निवेदन सादर केले. त्या सर्व मागण्या शासनाला कळविण्याचे आश्वासन उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

रेल्वेबाधित शेतकऱ्यांच्या प्रकल्पात गेलेल्या जमिनींची फेरमोजणी करून त्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, गडचिरोलीच्या विमानतळासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी अधिग्रहित करण्यात येऊ नये, रानटी हत्ती व वाघांचा ताबडतोब बंदोबस्त करावा, जीवहाणी झालेल्या किंवा जखमी झालेल्या लोकांना तातडीने अर्थसहाय्य देण्यात यावे, नुकसान झालेल्या पिकांची भरपाई त्वरित देण्यात यावी, शेतकऱ्यांचा प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, पीक विम्याचे पैसे त्वरित देण्यात यावे, पशुवैद्यकीय दवाखान्यात पुरेसे डॉक्टर्स व स्टाफ नेमण्यात यावा, समाजकल्याण विभागाचा अन्यत्र वळविण्यात आलेला निधी परत करून तो मागासवर्गीयांच्या कामासाठी खर्च करण्यात यावा, इत्यादी मागण्यांचा निवेदनात समावेश होता.

रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत आणि जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश दुधे, प्रदेश सचिव केशवराव साम्रुतवार, गडचिरोली विधानसभा प्रभारी प्रदीप भैसारे, जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद रायपुरे, कार्यालय सचिव अशोक खोब्रागडे, युवक आघाडीचे अध्यक्ष नरेंद्र रायपुरे आणि शहर प्रमुख अनिल बारसागडे, ज्येष्ठ कार्यकर्ते सुखदेव वासनिक, दादाजी धाकडे व अन्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.