गडचिरोली : जिल्ह्यातील बियाणे, खते व किटकनाशकांच्या खरेदी-विक्री, गुणवत्ता व पुरवठ्याच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणींचे तात्काळ निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर खरीप हंगाम 2025 करिता ‘निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. याशिवाय 13 भरारी पथकांमार्फतही तपासणी केली जाणार आहे.
खरीप हंगामासाठी 15 मे ते 15 ऑगस्ट 2025 आणि रबी हंगामासाठी 15 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत हा कक्ष कार्यरत राहणार आहे. या नियंत्रण कक्षाशी दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत मोबाईल क्रमांक 8275690169 तसेच टोल फ्री क्रमांक 18002334000 यावर संपर्क साधावा. तसेच तक्रार किंवा अडचण dsaogad15@gmail.com /adozpgad@gmail.com या मेलवरही पाठविता अथवा नोंदविता येईल, असे आवाहन कृषि विकास अधिकारी किरण खोमणे यांनी शेतकरी, कंपनी प्रतिनिधी, बियाणे, खते व किटकनाशके विक्रेते व सर्व नागरिकांना केले आहे.
जिल्हास्तरावर एक आणि प्रत्येक तालुकास्तरावर एक याप्रमाणे जिल्ह्यात एकूण 13 भरारी पथके स्थापन केलेली आहेत. बोगस बियाणे, खते विक्री करताना निदर्शनास आल्यास परवाना रद्द करण्यात येईल व कायदेशीर कारवाई केली जाईल. यासंबंधी कृषी विभागाचे पथक बारीक लक्ष ठेऊन आहे. बियाणे व खते यात बोगस कंपन्यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये याची काळजी कृषी विभागामार्फत घेतली जात आहे, तसेच युरिया खत ज्यादा दराने विक्री केल्याचे व युरियासोबत इतर अनावश्यक खते लिकिंग करीत असल्याचे निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी विकास अधिकाऱ्यांनी कळविले.