गडचिरोली : मानव-हत्ती संघर्ष टाळण्यासाठी जलद कृती दल अधिक सक्रिय करण्यासोबतच हत्तींच्या हालचालींबाबत पूर्वसूचना मिळण्यासाठी ‘मोबाईल अलर्ट सिस्टिम’ तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सोमवारी अधिकाऱ्यांना दिले. यात तंत्रज्ञानाचा वापर करून रानटी हत्ती नागरी वसाहतीपासून 5 किलोमीटरवर असताना रजिस्टर्ड मोबाईलवर त्याचा अलर्ट येईल, असे अलर्ट अॅप विकसित करण्याची सूचना त्यांनी केली. (सविस्तर बातमीसाठी खाली स्क्रोल करा)

सध्या जिल्ह्यात रानटी हत्तींच्या वाढत्या वावरामुळे निर्माण होणाऱ्या मानव-हत्ती संघर्षावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन गावंडे, अपर पोलीस अधीक्षक एम.रमेश, उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, सहाय्यक जिल्हाधिकारी रणजित यादव तसेच वनविभाग, पोलीस विभाग आणि इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
तंत्रज्ञानाचा वापर, हत्तींना कॅालर आयडी
हत्तींच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवण्यासाठी आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी हत्तींना कॉलर आयडी लावण्याचे व हत्ती नागरी वस्तीपासून पाच किलोमीटरच्या परिसरात आल्यास नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर वेळीच इशारा देण्यासाठी ‘अलर्ट ॲप’ तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. यासोबतच हत्तींवर लक्ष ठेवण्यासाठी जागोजागी टेहळणी बुरुज (वॅाच टॅावर) उभारून सुरक्षारक्षक नियुक्त करण्यास त्यांनी सांगितले.
ग्राम समितीमार्फत नियंत्रण
प्रत्येक गावात ग्रामस्तरावर तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, पोलीस पाटील, महसूल व वनविभागाचे कर्मचारी यांचा समावेश असलेल्या समित्या स्थापन करून त्यांच्यावर उपाययोजना संदर्भात विभागनिहाय जबाबदाऱ्या निश्चित करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. हत्ती गावात दिसल्यास समितीने तात्काळ 1926 या वनविभागाच्या टोल फ्री क्रमांकावर माहिती देणे बंधनकारक राहील. ड्रोन व इतर उपकरणांच्या मर्यादा लक्षात घेता, स्थानिक नागरिकांच्या सहभागातून मिळणारी माहिती अधिक प्रभावी ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी पंडा यांनी स्पष्ट केले.
सुरक्षिततेच्या सूचना आणि मानक कार्यपद्धती
हत्ती, विशेषतः टस्कर हत्ती आक्रमक स्वभावाचे असून वेगाने हालचाल करतात. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्याजवळ जाण्याचा, फोटो काढण्याचा किंवा उगाच गर्दी करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी पंडा यांनी केले. हत्ती बंदोबस्तासाठी वन विभाग, महसूल विभाग, पोलीस विभाग, कृषी विभाग व इतर सर्वांनी मिळून मानक कार्यपद्धती (SOP) तयार करण्याचे व त्यात ग्राम समित्यांची भूमिका स्पष्टपणे नमूद करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
हत्तींपासून नुकसान झाल्यास भरपाई देताना पोलीस यंत्रणेला सोबत नेण्याचे, तसेच हत्ती राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना पोलिसांनी रस्त्यावरील वाहतूक तात्काळ थांबवावी, असे निर्देशही देण्यात आले.
महत्त्वाच्या उपाययोजना
प्रत्येक गावात ग्रामस्तरीय समित्या स्थापन करून त्यांना कार्यक्षम बनवणे, हत्तींच्या हालचालीबाबत मोबाईल अलर्ट सिस्टिम विकसित करणे, संभाव्य धोक्यांसाठी पूर्वनियोजन तयार ठेवणे, आवश्यकतेनुसार पोलीस विभागाची मदत घेणे, टोल फ्री हेल्पलाईन नंबर कार्यान्वित ठेवणे, हत्तींच्या हालचालींच्या निरिक्षणासाठी रेडिओ कॉलरिंग करणे.
जनजागृती व समन्वयाची गरज
रानटी हत्ती नागरी वस्तीमध्ये न येण्यासाठी व त्याचे मार्ग परस्पर बदलविण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ करण्यात याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यांनी वनविभाग, महसूल, पोलीस, कृषी व इतर संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधून अल्पकालीन व दीर्घ मुदतीच्या उपाययोजना आखण्याचे, तसेच संयुक्त मानक प्रणाली तयार करण्यास सांगितले. गावकऱ्यांना हत्तींच्या आगमनाच्या वेळी कसे वागायचे, काय टाळायचे याचे प्रशिक्षण देणे व जनजागृती करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

































