आता व्हॉट्सअॅपवर मिळणार आपत्ती व्यवस्थापनाची माहिती

चॅट बोट प्रणालीचा शुभारंभ

गडचिरोली : जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित तातडीची, अचूक आणि अधिकृत माहिती नागरिक, अधिकारी व कर्मचारी यांना सहज मिळावी यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गडचिरोली यांच्यातर्फे आधुनिक चॅट बोट प्रणाली सुरु करण्यात आली आहे.

या प्रणालीचा शुभारंभ जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे, सहायक महसूल अधिकारी स्वप्नील माटे, तसेच पूर समन्वय अधिकारी गोपीचंद गव्हारे यांची उपस्थिती होती. (अधिक बातमी खाली वाचा)

ही प्रणाली व्हॉट्सअॅपवर आधारित असून जिल्ह्यातील पर्जन्यमान, धरणांचा विसर्ग, नदीच्या पाणीपातळीची सद्यस्थिती, हवामान अंदाज, संपर्क तुटलेली गावे व शहरे, बंद रस्त्यांची यादी, प्रशासनाच्या महत्त्वाच्या सूचना, विजेपासून बचावाच्या उपाययोजना आदी बाबतची अद्यावत व अधिकृत माहिती त्याद्वारे सहज मिळवता येणार आहे. त्यासाठी नागरिकांनी 8275371485 हा क्रमांक DDMA Gadchiroli या नावाने मोबाईलमध्ये सेव्ह करावा व व्हॉट्सअॅपवर ‘Hi’ असा मेसेज पाठवावा. त्यानंतर मिळालेल्या मेनूमधून हवी असलेली माहिती निवडता येते. QR कोड स्कॅन करूनही हा क्रमांक मोबाईलमध्ये सेव्ह करता येतो.

यासोबतच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकृत व्हॉट्सअप चॅनेलला https:// whatsapp.com/ channel/ 0029VbAPkzTKGGG8KdTvgY41 या लिंकवरून फॉलो करता येईल. आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक 07132-222031 आणि 222035, तसेच मोबाईल क्रमांक 9423911077, 8275370508, 8275370208 वर संपर्क साधावा. पोलीस नियंत्रण कक्षासाठी 07132-223142, 223149 आणि मोबाईल क्रमांक 9403801322 हे संपर्क क्रमांक दिले आहेत.

या प्रणालीचा अधिकाधिक नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी यावेळी केले.