गडचिरोली : दक्षिण गडचिरोली भागातील पुलांच्या सुरक्षिततेबाबतची चिंता दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित भागांतील पुलांची नियमित पाहणी व आवश्यक तेथे स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे.
मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी आणि सिरोंचा या पाच तालुक्यांतील सर्व पुलांचे मॉन्सूनपूर्व संरचनात्मक निरीक्षण कार्यकारी अभियंता व उपअभियंत्यांमार्फत करण्यात आले आहे. यामध्ये स्थानिक परिस्थितीचा विचार करून ज्या पुलांमध्ये दुरुस्तीची गरज आहे, अशा पुलांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव तयार करून सादर करण्यात येत आहेत. काही ठिकाणी आवश्यकतेनुसार स्ट्रक्चरल ऑडिटही करण्यात येत असल्याचे सा.बां.विभागाने कळविले. (अधिक बातमी खाली वाचा)
विशेषतः अहेरी तालुक्यातील वट्रा गावाजवळील नाल्यावर आणि परसेवाडा गावाला जोडणाऱ्या नाल्यावर नवीन पुलांची गरज ओळखून त्याचे प्रस्ताव येत्या जुलै 2025 च्या अर्थसंकल्पात सादर करण्यात येणार आहेत. या पुलांच्या कामांमुळे नागरिकांना वर्षभर सुरक्षित वाहतुकीची सुविधा उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, लक्ष्मण नालावरील पुलाची कार्यकारी अभियंत्यांनी पाहणी केली असून सद्यस्थितीत तो पूल वाहतुकीस योग्य असल्याचे निरीक्षणात आले आहे. तसेच, दिना नदीवरील पूल हा राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अखत्यारीत येतो. या पुलाच्या स्थितीबाबत माहिती देऊन आवश्यक कार्यवाहीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्लीचे कार्यकारी अभियंता यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाशी संपर्क साधला आहे.