सेवाभावी उपक्रमांनी साजरा झाला मा.खा.नेते यांचा वाढदिवस

विविध उपक्रमांची अंमलबजावणी

गडचिरोली : भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ.अशोक नेते यांचा वाढदिवस मंगळवारी अत्यंत उत्साहाच्या वातावरणात, विविध सेवाभावी उपक्रमांच्या माध्यमातून आणि लोकसहभागातून साजरा करण्यात आला.

सुरूवातीला गडचिरोलीकरांचे आराध्यदैवत सेमाना हनुमान मंदिरात पूजाअर्चा व आरती केल्यानंतर सेमाना गार्डनमध्ये ‘एक पेड़ माँ के नाम’ या संकल्पनेतून वृक्षारोपण करण्यात आले. विवेकानंद नगरातील मातोश्री वृद्धाश्रमात अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे मूकबधिर विद्यालय मुरखडा आणि कौशल्य निवासी मतीमंद विद्यालय बोदली येथे शैक्षणिक साहित्य वाटप करून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यात आले.

मनस्वीनी मंचतर्फे आयोजित ‘डॉक्टर्स डे’ कार्यक्रमात हजेरी लावल्यानंतर महिला व बाल रुग्णालयात ‘माणुसकीचा एक ध्यास’ म्हणून अन्नदान करण्यात आले. तसेच सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन सोहळ्यात सहभागी होऊन रुद्र पूजासुद्धा करण्यात आली.

यादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात गजानन गेडाम (रा.गोविंदपूर) या रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीची डॅा.अशोक नेते यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. त्याच ठिकाणी ‘डॉक्टर्स डे’ निमित्ताने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक सतीशकुमार सोळंके यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

दिवसभर डॉ.नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छांचा वर्षाव केला.