गडचिरोली : विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यात राष्ट्रीयतेची भावना आणि जिज्ञासा वाढीस लागावी या उद्देशाने राज्य शासन विविध उपक्रम राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक कथा वाचण्याची संधी मिळावी यासाठी एक हजार शाळांमध्ये भिंतीवरील पुस्तकालय साकारण्यात येणार आहे.
रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून यासाठी 50 हजार पुस्तके उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. सुमारे एक लाख विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल. ‘स्वप्नोंका पिटारा’ हे या ट्रस्टचे भिंतीवर लावता येणारे छोटे पुस्तकालय आहे. प्रत्येक पुस्तकालयामध्ये विज्ञान आणि अंतराळ संशोधनातील अद्भूत गोष्टी, जीवनमूल्य, नेतृत्व, लोककथा, स्वातंत्र्यसैनिक आणि शूर सैनिकांच्या कथा, पुराणकथा, कल्पनारम्य जग आदी विषयांवर आधारित सुमारे 50 रंगीत, काळजीपूर्वक निवडलेली मराठी आणि इंग्रजी भाषेतील दर्जेदार कथा पुस्तके राहणार आहेत.
रत्ननिधी स्टोरीबुक प्रकल्प हा भारतातील बालसाहित्य वाचन क्रांती घडविण्यासाठीचा उपक्रम आहे. यामध्ये एक दशलक्ष दर्जेदार कथा पुस्तकांची निर्मिती, प्रकाशन आणि मोफत वितरण केले जात आहे. यामधून 5 ते 14 वयोगटातील मुलांसाठी दर्जेदार पुस्तके उपलब्ध करुन लहान वयात वाचनाची सवय लावणे, सर्जनशील आणि बौद्धिक जिज्ञासेची वाढ करणे आदी उद्देश साध्य केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून गडचिरोली जिल्ह्यासाठी एक हजार शाळांमध्ये पुस्तकालय सुरू करण्यात येत आहेत.
गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील शाळांमध्ये पुस्तकालये स्थापन करण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. या आठवड्यापासून ही पुस्तकालये शाळांच्या भिंतीवर बसविण्याचे काम सुरू करून येत्या सहा महिन्यात हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. भविष्यात जिल्ह्यातील सर्व 1991 शाळांमध्ये असे पुस्तकालय सुरू करण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे.