अहेरी : नागेपल्ली ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या प्रभाग क्रमांक 2 मधील विविध समस्यांकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने तेथील संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालय गाठून त्या समस्यांचे निवेदन सादर केले. या समस्या तत्काळ सोडवा, अन्यथा ग्रामपंचायतीला घेराव घालण्याचा इशारा या संतप्त महिलांनी दिला.
नागेपल्ली ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या विविध प्रभागांमध्ये अनेक समस्या आ-वासुन आहेत. प्रभाग क्रमांक 2 मध्ये देखील अनेक समस्या असून पावसाळ्यात नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 2 ही सुशिक्षित नागरिकांची वस्ती असून या प्रभागातील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडून आकारलेले विविध कर वेळोवेळी भरले आहेत. मात्र ग्रामपंचायतचे इतर प्रभागांप्रमाणेच या ही प्रभागाकडे दुर्लक्ष होत असल्याने येथील महिलांनी बुधवारी (2 जुलै) थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठून संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
यावेळी झालेल्या चर्चेत समस्या त्वरित सोडविण्याची मागणी केली. निवेदन देताना पुष्पा रंगुवार, योगिता सोनलवार, उजयता कुंदोजवार, उर्मिला चौधरी, संगीता भजने, संघमित्रा जनबंधू, गीता गर्जे, विमल तरेवार, निर्मला सरवर, किरण चिट्टीवार, मोनिका मुजुमदार, सत्यशिला देवगडे, सुनीता करमे, रूपा अनुमानला, लक्ष्मी इप्पाला आदी महिला उपस्थित होत्या.
काय आहेत समस्या आणि मागण्या?
जल जीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा नियमित सुरू करणे, वर्षातून किमान दोनदा नाल्यांची सफाई करणे, कचराकुंड्या नियमित सफाई करणे, दररोज घंटागाड्या प्रभागात फिरविणे, नाली सफाई करून व्यवस्थित पूर्ववत झाकणे, वीज पुरवठा खंडित होणार नाही याकडे लक्ष देणे, रस्त्यावरील वीजेच्या खांबांवरील बंद असलेले दिवे लावणे, डासनाशक फवारणी करणे, आरोग्याच्या दृष्टिकोनातून स्वच्छता राखणे तसेच प्रभागात झालेल्या सिमेंट रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेऊन नवीन सिमेंट रस्त्यांचे बांधकाम करणे, एवढेच नव्हेतर पावसाळ्यात कुठे रोगराई उद्भवणार नाही याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, आदी मागण्यांचा यात समावेश होता. ग्रामपंचायत अधिकारी लोमेश वाळके यांना हे निवेदन देण्यात आले.