‘गोंडवाना’च्या विज्ञान-तंत्रज्ञान संशोधन केंद्राला कृषी पुरस्कार

कृषीमंत्र्यांच्या हस्ते झाला गौरव

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मंगळवारी कृषी दिनानिमित्त आयोजित दिमाखदार सोहळ्यातगोंडवाना विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संशोधन केंद्राला प्रतिष्ठित ‘स्व.वसंतराव नाईक कृषि पुरस्कार’ कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

हा पुरस्कार विशेषत्वाने गोंडवाना विद्यापीठाच्या गडचिरोली येथील विज्ञान व तंत्रज्ञान संशोधन केंद्राला मिळाला आहे. हे केंद्र राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाच्या प्रेरणेने 2014 साली स्थापन करण्यात आले आहे. या केंद्राच्या स्थापनेत स्वप्नील गिरडे, गंधर्व पिलारे, आशिष घराई यांचे सहकार्य आणि प्रगती गोखले, डॉ.सी.डी.माई, डॉ.अनिल काकोडकर आणि डॉ.शहा यांची प्रेरणा उल्लेखनीय आहे.

गडचिरोली जिल्ह्यात विज्ञान व तंत्रज्ञानाच्या सुविधा इतर भागाच्या तुलनेत कमी उपलब्ध आहेत. ही कमतरता दूर करण्यासाठी स्थापन झालेले हे केंद्र गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक व सामाजिक विकासामध्ये एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यात व त्यांना आधुनिक तंत्रज्ञानामध्ये पारंगत करून देण्यासाठी हे केंद्र मोलाचे कार्य करते.

शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे, कौशल्य विकास, रोजगार निर्मितीला चालना, सामाजिक बदल व स्थानिक समस्यांवर उपाय हे उद्देश समोर ठेवत हे केंद्र गडचिरोलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ बनले आहे.
त्यामुळे कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल आणि नावीन्यपूर्ण संशोधनाद्वारे शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रयत्नांची दखल म्हणून या केंद्राला कृषी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. विद्यापीठातील आदिवासीबहुल क्षेत्रामध्ये व ग्रामीण युवकांसाठी करत असलेल्या परिश्रमासाठी विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्राचे कार्य महाराष्ट्रासाठी आदर्श ठरले आहे.

कृषिमंत्री कोकाटे यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या कार्याचे कौतुक करत कृषी क्षेत्रातील संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी बोलताना कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे म्हणाले, हा पुरस्कार केवळ गोंडवाना विद्यापीठाचा नव्हे, तर येथील सर्व प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचे हे फलित आहे.आम्ही भविष्यातही कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.