गडचिरोली : पावसाळ्याच्या दिवसात विदर्भात सर्वाधिक आपत्तींचा सामना करावा लागणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात यावर्षीही प्रशासनाने सर्व प्रकारची तयारी केली आहे. त्यात नाविन्यपूर्ण प्रयोग म्हणून पुरामुळे संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये अत्यावश्यक औषधी किंवा इतर साहित्य पुरवठा करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे. विशेष म्हणजे राज्यात पहिल्यांदा गडचिरोली जिल्ह्यात साहित्य पोहोचवण्यासाठी ड्रोनचा वापर होणार आहे. या पायलट प्रोजेक्टसाठी आयआयटी मुंबई या संस्थेची मदत घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली.
पूरपरिस्थितीत सर्वाधिक आरोग्याशी निगडीत समस्या निर्माण होतात. त्यामुळे संपर्क तुटणाऱ्या 112 गावांमध्ये आधीच पुरेसा औषधीसाठा पोहोचवण्यात आला आहे. तसेच पावसाळ्याच्या तीन महिन्यात प्रसुती होऊ शकणाऱ्या गर्भवती महिलांना ‘माहेरघर’ म्हणून आधीच आरोग्य संस्थेत आणण्यात आले आहे. याशिवाय तीन महिने पुरेल एवढे अन्नधान्यही संपर्क तुटणाऱ्या गावातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये साठवून ठेवण्यात आले आहे.
दरम्यान नदी-नाल्यांना पूर असल्यास आवश्यक औषधी किंवा इतर साहित्य तातडीने पोहोचवण्याची गरज भासल्यास ड्रोनचा वापर केला जाणार आहे. पूरस्थितीत अनेक वेळा वीज पुरवठा खंडीत होतो. त्यामुळे मोबाईल टॅावर काम करत नसल्याने संपर्क सुविधा ठप्प पडते. अशावेळी तातडीने संदेशाचे आदान-प्रदान करण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयात वॅाकी-टॅाकीची सुविधाही देण्यात आली आहे.
मदतीसाठी विविध चमू तयार
पावसाळी आपत्तींवर मात करण्यासाठी एसडीआरएफची चमू 3 महिन्यांसाठी जिल्ह्यात दाखल झाली आहे. याशिवाय केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तीन चमू तैनात आहेत. राज्य राखीव पोलीस दलाचीही एक चमू तयार आहे. गरज पडेल त्यावेळी एनडीआरएफची चमू तात्काळ पोहोचणार आहे. याशिवाय सर्व धोकादायक ठरू शकणाऱ्या भागांमध्ये 299 प्रशिक्षित ‘आपदा मित्र’ हे गावकरी आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा यांच्यातील दुवा बनून सक्रिय राहणार आहेत.