गडचिरोली : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवश्यक असलेले खत वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात मिळण्यासाठी कृषी विभागाने एप्रिल ते जून 2025 या तिमाहीत रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा केला आहे. यात शेवटच्या टोकावरील सिरोंचा तालुक्यातही खत पोहोचले आहे. त्यामुळे खतांचा काळाबाजार होण्यास आळा बसेल, असा दावा कृषी विभागाने केला आहे.
कोरोमंडल इंटरनॅशनल या कंपनीकडून 1100 मेट्रिक टन 20:20:0:13 ग्रेड खताचे वितरण करण्यात आले आहे. युरियाचा संरक्षित साठा 277 मेट्रिक टन इतका असून किरकोळ विक्रीसाठी 100 टन अतिरिक्त युरिया उपलब्ध करण्यात आला आहे. कृषीधन, कृषी देव, कृषी उद्योग यासारखी मिश्र खते देखील जिल्ह्याच्या विविध तालुक्यांतील बाजारात उपलब्ध आहेत.
जुलै महिन्यातील नियोजनानुसार गडचिरोली जिल्ह्यासाठी 2400 मेट्रिक टन युरियाचा पुरवठा निश्चित असून, त्यापैकी एक रॅक 2 जुलै रोजी वडसा येथे दाखल झाली आहे. पुढील आठवड्यात आरसीएफ कंपनीकडून 1200 मेट्रिक टन युरियाची रॅक येणार आहे. त्यानंतर कोरोमंडल कंपनीकडून 20:20:0:13 ग्रेड खताची रॅक 10 ते 12 जुलै दरम्यान पोहोचणार आहे.
सिरोंचा तालुक्यावर विशेष भर
सिरोंचा तालुक्यात यंदा सुरुवातीला वाहतुकीच्या अडचणी आणि रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेता काहीसा अडथळा निर्माण झाला होता. मात्र, कृषी विभागाने खत कंपन्या आणि ट्रान्सपोर्ट एजन्सीजसोबत समन्वय साधून सदर अडथळ्यांवर मात केली आहे. 2 जुलै रोजी आलेल्या वडसा रॅकमधून सिरोंचासाठी 100 मेट्रिक टन युरियाचा पुरवठा करण्यात आला आहे. यानंतर 8 ते 10 जुलै दरम्यान येणाऱ्या रॅकमधून सिरोंचासाठी 150 मेट्रिक टन युरिया, तर 10 ते 12 जुलै दरम्यान येणाऱ्या कोरोमंडल रॅकमधूनही गरजेनुसार पुरवठा केला जाणार असल्याचे कृषी विभागाने कळविले.
सध्या सिरोंचा तालुक्यात युरिया – 824 मेट्रिक टन, डीएपी – 25 टन आणि एनपीके कॉम्प्लेक्स – 745 टन इतका साठा उपलब्ध आहे. 4 जुलै रोजी वडसा येथून आणखी 100 मेट्रिक टन युरियाचा पुरवठा करण्यात आला.
डीएपी खताला पर्यायी खत वापराबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण केली आहे. कृषी अधिकारी आणि तंत्रज्ञ शेतकऱ्यांना एसएसपी, कृषीधन, कृषी देव यासारख्या पर्यायी स्फुरदयुक्त खतांचा वापर करण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत.
जिल्ह्यातील कोणत्याही भागात खत टंचाई जाणवू नये यासाठी कृषी विभाग सज्ज असून, शेतकऱ्यांच्या गरजेनुसार तालुकास्तरावर वेळेवर खत पोहोचवले जात आहे. किरकोळ विक्रेत्यांशी समन्वय साधून प्रत्येक तालुक्यात नियमित साठा राखला जात असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी कळविले आहे.