काँग्रेसचे आज अधिकाऱ्यांच्या दालनापुढे थाळी वाजता आंदोलन

मलेरिया नियंत्रणाकडे दुर्लक्ष?

गडचिरोली : आरोग्य प्रशासन आणि शासनाच्या निष्क्रियतेमुळे जिल्ह्यातील मलेरिया रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यातूनच अनेकांना जीव गमवावा लागला, असा आरोप करत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज (दि.8) जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दालनापुढे थाळी वाजवा आंदोलन केले जाणार आहे.

यावर्षी आतापर्यंत जिल्ह्यात अडीच हजाराहून अधिक मलेरियाचे रुग्ण आढळले आणि काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना महामारीच्या काळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला कोरोनाला हद्दपार करण्यासाठी ‘ताली बजाओ, थाली बजाओ, दिए जलाओ’ असे आवाहन केले होते. त्यामुळे कोरोना जाईल असा दावा करण्यात आला, तसाच काही आदेश पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहपालकमंत्री आशिष जयसवाल यांनी काढावा आणि जिल्ह्यातील वाढत असलेल्या मलेरियावर उपाययोजना कराव्या, असे आवाहन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले आहे.

जिल्ह्याच्या आरोग्य विभागात अनेक पदं रिक्त आहेत. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात आरोग्य सेविका आणि कर्मचारी उपलब्ध नाहीत, अजूनही अनेक गावांमध्ये औषधीसाठा, गोळ्यांचा पुरवठा झालेला नाही. दरवर्षी पावसाळ्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा निष्क्रिय कारभार पुढे येतो. अपुऱ्या व्यवस्थेमुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. यावर तात्काळ उपाययोजना कराव्या, अशी काँग्रेसची मागणी आहे.

या सर्व प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी 8 जुलै रोजी दुपारी 3 वाजता, ‘गो मलेरिया गो, पालकमंत्री दो, आरोग्याला प्रशासने दिला खो,’ म्हणत जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या दालनासमोर ‘थाली बजाओ, ताली बजाओ’ आंदोलन करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी सांगितले.