आणखी तीन दिवस पावसाचे, धानाच्या रोवण्यांना आला वेग

दोन दिवस थांबवा शेतीची कामे

गडचिरोली : जिल्ह्यात सर्वत्र आता रोवणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी धान रोवणीसाठी लगबग सुरू केली आहे. पण आज आणि उद्या (मंगळवार, बुधवार) हे दोन जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पावसासोबत विजांचा कडकडाट आणि वादळ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे हे दिवस शेतीची कामे थांबवण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर द्वारा प्रसारित अंदाजानुसार, गडचिरोली जिल्ह्यात 7 जुलै रोजी सर्वत्र हलका ते मध्यम पाऊस, तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता आहे.

तसेच 8 जुलै रोजी सर्वत्र हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार स्वरूपाचा पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

9 जुलै रोजी सुद्धा हलका ते मध्यम पाऊस आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस तथा विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 10 जुलै रोजी हलका ते मध्यम पाऊस राहील पण वादळ किंवा विजांचा कडकडाट राहणार नाही.

शेतकरी, नागरिकांनी दक्षता घ्यावी

– शेतकरी बांधवांनी आकाशिय विजेपासून सुरक्षिततेसाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय निश्चित करावा. शेततळे, तलाव, नदी, पडके गोठे, झाडे अथवा इतर असुरक्षित ठिकाणी आश्रय घेणे टाळावे.
– मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता शेतकरी व शेतमजूर बांधवांनी स्वतः वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून (नदी, नाले, ओढे इत्यादी) जाणे टाळावे, तसेच आपली जनावरे वाहत्या पाण्यातून जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
– शेती कामे पुढील 2 ते 3 दिवस थांबवावी.पशुधनास उघड्यावर चरावयास सोडणे टाळावे. जनावरांना गोठ्यातच चाऱ्याची व पाण्याची व्यवस्था करावी.
– विजांच्या ठिकाणांची निरीक्षणे व पूर्वसूचना प्राप्त करण्यासाठी दामिनी अॅप डाऊनलोड करावे.