डॉ.अशोक नेते, कृष्णा गजबे भाजपच्या राज्य परिषदेवर

जिल्ह्यातील चार जणांना संधी

गडचिरोली : भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने बुधवारी राज्य परिषदेवरील 454 सदस्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. या नियुक्त्यांमध्ये गडचिरोलीच्या भूमीतून जनतेच्या सेवेसाठी समर्पित असलेले, भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ.अशोक नेते यांची राज्य परिषद सदस्य म्हणून निवड करण्यात आली. याशिवाय माजी आमदार कृष्णा गजबे यांनाही या यादीत स्थान मिळाले. त्यांच्या निवडीचे जिल्ह्यात सर्वदूर स्वागत होत आहे.

सामाजिक बांधिलकी, पक्षनिष्ठा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी नाळ जुळवून प्रभावी भूमिका घेणाऱ्या डॉ.अशोक नेते यांच्या नेतृत्वाला मिळालेला हा सन्मान म्हणजे त्यांच्या दीर्घकालीन योगदानाची पावती असल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. गडचिरोली जिल्ह्यासह पूर्व विदर्भातील जनतेशी आत्मियतेने जोडले गेलेले त्यांचे नेतृत्व नव्या जबाबदारीसह अधिक व्यापक पातळीवर काम करेल, असा विश्वास कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

डॅा.नेते यांच्यासह माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, माजी आ.कृष्णा गजबे, डॅा.चंदा कोडवते यांनाही या कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. या नव्या नियुक्तीबद्दल डॉ.अशोक नेते, कृष्णा गजबे यांचे, तसेच इतर नवनियुक्त सदस्यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.

“नव्या जबाबदाऱ्यांच्या माध्यमातून लोकसेवेच्या कार्यात अधिक जोमाने सहभागी होण्याची संधी लाभली आहे. पक्षश्रेष्ठींनी दाखवलेला विश्वास हीच खरी ऊर्जा आहे”, अशी प्रतिक्रिया मा.खा.डॅा.अशोक नेते यांनी व्यक्त केली.