आरमोरी मार्गासह जिल्ह्यात सात मार्गांवरील वाहतूक सुरू

नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश

गडचिरोली : जिल्ह्यात आज (दि.11) पूरपरिस्थितीतून नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. रात्रभरात 15 पैकी 7 मार्गांवरील वाहतूक सुरू झाली आहे. त्यात गडचिरोली ते आरमोरी या मुख्य मार्गाचा समावेश आहे. मात्र गडचिरोली ते चामोर्शी या मुख्य मार्गांसह एकूण 8 मार्गांवरील वाहतूक अजूनही बंद आहे. गोसीखुर्द धरणातील विसर्ग कमी करण्यात आल्याने आज संध्याकाळपर्यंत बहुतांश पूल आणि रस्त्यांवर चढलेले पाणी ओसरून ते मार्ग सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सध्या बंद असलेले मार्ग हे आहेत

1) गडचिरोली ते चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग (शिवणी नाला)
2) आष्टी ते आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग (दिना नदी)
3) अहेरी ते वटरा, बेजुरपल्ली, परसेवाडा रस्ता राज्यमार्ग (वटरा नाला), तालुका अहेरी
4) अहेरी ते देवलमारी, व्यंकटरावपेठा, मोयाबिनपेठा रस्ता राज्यमार्ग, तालुका अहेरी (देवलमारी पुल, व्यंकटरावपेठा पूल)
5) चौडमपल्ली ते चपराळा रस्ता, तालुका चामोर्शी
6) चामोर्शी ते मार्कंडादेव रस्ता, तालुका चामोर्शी
7) भेंडाळा ते बोरी, अनखोडा रस्ता, तालुका चामोर्शी
8) वेलतूर ते एकोडी रस्ता, तालुका चामोर्शी

प्रशासनाने कळविल्यानुसार, गुरूवारी संध्याकाळी वैनगंगा नदीची पाणी पातळी वडसा, आष्टी, चिचडोह बॅरेजच्या ठिकाणी धोका पातळीच्या वरच होती. ती आता कमी होण्याची शक्यता आहे. काल संध्याकाळपर्यंत गडचिरोली ते आरमोरी मार्गावरील (राष्ट्रीय महामार्ग 353-सी) पाल नदी, कोलांडी नाला, गाढवी नदी आदी ठिकाणी पुलावर पाणी चढले असल्याने हा मार्ग बंद होता. आज सकाळी तो वाहतुकीसाठी सुरू झाल्याने अडून पडलेल्या शेकडो वाहनांना दिलासा मिळाला.

गडचिरोली ते चामोर्शी (रा.मा.353-सी) हा गोविंदपूर नाला व शिवणी नाल्याच्या पुरामुळे बंद आहे. जिल्ह्यात एकूण 8 मार्गांवरील वाहतूक आता बंद आहे. दरम्यान चार दिवसांपासून नदी-नाल्यांलगतच्या शेतात पाणी साचलेले असल्याने अनेक शेतकऱ्यांचे कोवळे पीक खरडून गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बरेच नुकसान सहन करावे लागणार आहे.

नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी, वादळ, पूर व अन्य नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ व योग्य पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व कृषी अधिकारी यांना दिलेल्या आदेशानुसार, नैसर्गिक आपत्तीमुळे मृत व्यक्ती, शेतातील पिके, घरे, जनावरे, गोठे, घरगुती भांडी, साहित्य व मालमत्ता इत्यादी नुकसानग्रस्त घटकांचा संपूर्ण व तातडीने आढावा घेऊन शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पंचनामे करावेत. मृत व्यक्ती व पशुहानी, तसेच घरगुती सामानाच्या नुकसानीसाठी देय होणारी मदतीची रक्कम प्राधिकार पत्रावर देयके सादर करून तात्काळ वितरित करण्याचीही सूचना त्यांनी दिली आहे.