गडचिरोली : पावसामुळे काही दिवसांपासून गडचिरोली आरमोरी महामार्गाची अवस्था बिकट होऊन मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र महामार्ग प्राधिकरणचे याकडे दुर्लक्ष आहे. वारंवार निवेदन देऊनसुद्धा रस्ता दुरुस्ती करण्यास दिरंगाई होत असेल तर त्या रस्त्यावरील खड्ड्यात बसून आंदोलन केले जाईल, असा इशारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितेश राठोड यांनी दिला. (अधिक बातमी खाली वाचा)

महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असून सुद्धा जिल्ह्यामध्ये रस्त्यांची अवस्था बिकट आहे. जिल्ह्यात स्थानिक प्रशासनात फक्त प्रभारी अधिकारी आहेत. एवढा मोठा जिल्हा असूनसुद्धा राष्ट्रीय महामार्गासाठी एक पूर्णवेळ अधिकारी नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. पालकमंत्र्यांनी हेलिकॉप्टरने दौरा न करता एकदा जिल्ह्यातील रस्त्यांवरून फिरावे अशीही मागणी राठोड यांनी केली.
निवेदन देताना गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितेश राठोड, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष विवेक घोंगडे, जिल्हा महासचिव अभिजित धाईत, शहर उपाध्यक्ष सारंग हेमके, जिल्हा महासचिव गौरव येनप्रेड्डीवार, तालुका अध्यक्ष स्वप्निल बेहरे, एनएसयुआयचे महासचिव अभिषेक चौधरी उपस्थित होते.