गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. त्यातच भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे प्रमुख नद्यांसह उपनद्यांची पाणी पातळी चांगलीच वाढली. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून बहुतांश ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मंगळवारी गडचिरोली जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला होता. बुधवार आणि गुरूवारी आॅरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान संभाव्य पूरस्थिती पाहता जिल्हाधिकारी संजय मीना यांनी गुरूवारी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुटी जाहीर केली आहे.
बुधवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार, जिल्ह्यात २४ तासात ४२.५ मिमी पाऊस झाला. त्यात सर्वाधिक ११५.४ मिलीमीटर पाऊस चामोर्शी तालुक्यात झाला. दरम्यान मंगळवारी एटापल्ली तालुक्यातील बांडे नदीवरील पुलावरून पाणी वाहात असताना त्यातून वाहन पुढे काढण्याच्या प्रयत्नात एक जीपगाडी पुलावरून नदीत कोसळली. त्यात बसलेल्या दोन मायनिंग अभियंत्यांसह चालकाने प्रसंगावधान राखत उड्या घेतल्याने त्यांचा जीव वाचला. ती गाडी पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले.
मंगळवारी जिल्ह्यातील १६ मार्ग पूरस्थितीमुळे वाहतुकीसाठी बंद होते. बुधवारी त्यातील बहुतांश मार्ग मोकळे झाले. संध्याकाळी ७ वाजता केवळ चार मार्ग बंद होते. त्यात चांदाळा ते कुंभी, रानमूल ते माडेमूल, अहेरी ते मोयाबीनपेटा आणि आलापल्ली ते भामरागड या चार मार्गांचा समावेश आहे.