प्रॅापर्टी कार्डपासून वंचित लोकांची आलापल्लीत सभा

समन्वयातून प्रश्न सोडविणार

आलापल्ली : माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार डॅा.धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात आलापल्ली गावातील अनेक नागरिकांना प्रॅापर्टी कार्डचे वितरण करण्यात आले आहे. मात्र तरीही काही नागरिक अद्याप वनपट्ट्यापासून वंचित आहेत. अशा वंचित असलेल्या नागरिकांची सहविचार सभा शनिवारी (दि.12) आलापल्लीत झाली. यावेळी वन विभाग आणि लाभाथीं यांच्यात समन्वय साधून प्रॉपर्टी कार्डचा पक्ष निकाली लावण्याचे आश्वासन सिनेट सदस्य तथा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तनुश्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले. (अधिक बातमी खाली वाचा)

जोपर्यत प्रॉपर्टी कार्ड नसेल तोपर्यंत लाभार्थ्याना आपल्या भूखंडावर इतर लाभ घेता येत नाही. त्यामुळे प्रॅापर्टी कार्ड असणे गरजेचे आहे. नागरिकांना प्रॅापर्टी का्र्ड मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार, त्यासाठी प्रत्येकाने आपली आवश्यक कागदपत्रे जुळवून ठेवावी. वनविभाग व लाभार्थी यांच्यात योग्य समन्वय साधून हा प्रश्न निकाली काढण्यात येईल, असे तनुश्री आत्राम यांनी सांगितले.

या सभेला विधानसभा प्रमुख लक्ष्मण येर्रावार, ग्रामपंचायत सदस्य पुष्पा अलोने, राष्ट्रवादीचे जिल्हा महासचिव कैलास कोरेत यांनीही या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मनोज बोलुवार, सोमेश्वर रामटेके, अनुसया सस्पीडवार, शारदा कळते, वासुदेव पेद्वीवार, पराग पांढरे, कार्तिक निमसरकार, शारदा भुजंगराव कडते, कैलास कोरेत आदी प्रामुख्याने उपस्थित होते.