गडचिरोली : तेली समाजातील विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीमध्ये चांगले गुण प्राप्त करून उच्चशिक्षण घ्यावे आणि समोर जाऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करून चांगले यश मिळवावे. यातून स्वत:सोबत तेली समाजाचाही नावलौकिक वाढेल, असे मार्गदर्शन तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रमोद पिपरे यांनी केले. संताजी सोशल मंडळ गडचिरोलीच्या वतीने आयोजित गुणवंतांच्या सत्कार समारंभात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
संताजी भवन, सर्वोदय वॉर्ड येथे झालेल्या या कार्यक्रमात दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच तेली समाजातील एमपीएससी, युपीएससी, पीएचडी, एमबीबीएस, तसेच नवोदय स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक म्हणून सेवानिवृत्त पोलीस पाटील सुखदेव बारसागडे व समाजसेवक बाळासाहेब बाळेकरमकर यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकार खंडपीठ मुंबईचे अध्यक्ष तथा माजी धर्मदाय आयुक्त, समाजभूषण प्रमोद तरारे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी संताजी सोशल मंडळाचे अध्यक्ष प्रा.देवानंद कामडी, तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावलीचे सहाय्यक प्राध्यापक डॉ.रामचंद्र वासेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्था आरमोरीचे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे, माजी नगरसेवक तथा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पिपरे, संताजी सोशल मंडळाचे सचिव विठ्ठलराव कोठारे, संताजी स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकर वासेकर, संताजी सोशल मंडळाचे कोषाध्यक्ष राजेश इटनकर, कार्याध्यक्ष गोपीनाथ चांदेवार, तेली सेनेचे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक तथा इ-गवर्नरचे संचालक नरेंद्र तरारे, सुधाकर लाकडे, सुरेश भांडेकर, भगवान ठाकरे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र सरकारने संत जगनाडे महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे. त्यामुळे समाजातील गरजू, गरीब, शेतकरी, मध्यमवर्गीय व बेरोजगार विद्यार्थ्यांना आर्थिक मदत होणार असून त्यांना स्वतःचा उद्योग उभा करून आपला आर्थिक विकास करण्याची संधी मिळणार असल्याचे यावेळी प्रमोद पिपरे यांनी सांगितले.
याप्रसंगी माजी धर्मदाय आयुक्त प्रमोद तरारे, भाग्यवान खोब्रागडे, प्रा.रामचंद्र वासेकर व प्रा.देवानंद कामडी यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.