गडचिरोली : कोनसरी येथील लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) च्या 4.5 दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेच्या स्टील प्रकल्पाची पायाभरणी येत्या 22 जुलै रोजी मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. हा प्रकल्प विदर्भातील पहिला एकात्मिक स्टील प्रकल्प ठरणार आहे. विशेष म्हणजे त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांचा वाढदिवसही आहे. या वर्षाच्या पहिल्या दिवसी (1 जानेवारी) मुख्यमंत्री फडणवीस गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. आता स्वत:च्या वाढदिवसाच्या दिवशीही ते गडचिरोलीत राहतील.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते हेडरी येथे उभारण्यात आलेल्या 5 दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेच्या आयर्न ओर ग्राइंडिंग प्लांटचे उद्घाटनही होणार आहे. हा प्रकल्प ‘एलएमईएल’ने केवळ एका वर्षात पूर्ण केला आहे. यासोबतच 10 दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेच्या स्लरी पाईपलाइन प्रकल्पाचे उद्घाटनही होणार आहे.
ही स्लरी पाईपलाइन महाराष्ट्रातील पहिली लोखंड स्लरी पाईपलाइन ठरणार आहे. हेडरी ते कोनसरी अशी 85 किमी लांबीची पॅलेट प्लांटदरम्यान असलेली ही पाईपलाइन कच्च्या मालाच्या वाहतुकीसाठी महत्त्वाची असून, ती कार्बन उत्सर्जनात 55 टक्के घट करेल आणि संपूर्ण प्रकल्पाच्या दळवणळणाची कार्यक्षमता वाढवेल.