अहेरी : कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे अर्धवट असलेल्या आणि खड्डेमय झालेल्या रस्त्यांचा विषय घेऊन पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आलापल्लीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित रव्वा यांची भेट घेतली. अर्धवट व रखडलेले रस्ते लवकर पूर्ण करा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार, असा इशारा यावेळी देण्यात आला.
अहेरी येथील मुख्य रस्त्याच्या कामाच्या कंत्राटदाराकडून होत असलेला निष्काळजीपणा आणि लेटलतिफपणामुळे रस्त्याचा बोजवारा वाजला आहे. त्यात वांगेपल्ली येथील पोचमार्गावर खड्डे पडले आहे. महागाव, देवलमरी रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करण्यात येत नाही. यावर हर्षवर्धनबाबा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
यावेळी डॉ .मिताली आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख, आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम, तालुकाध्यक्ष नागेश मडावी, सुरेंद्र अलोणे , विशेष भटपल्लीवार, कैलास कोरेत, वासुदेव पेद्दीवार, जावेद अली, पराग पांढरे, रतन दुर्गे, मांतय्या आत्राम, तिरुपती मडावी, जाफर अली आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्गाचे वाजले तीनतेरा
आष्टी ते लगाम, आलापल्ली आणि आलापल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गासह आलापल्ली ते मुलचेरा मार्ग आणि अहेरी विधानसभेतील प्रत्येक रस्ते आणि पुलांच्या विषयावर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. तांत्रिक अडचणी आणि ठेकेदारांच्या कामचुकारपणामुळे नागरिकांना, विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे गांभिर्याने लक्ष न दिल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा हर्षवर्धनबाबा आत्राम यांनी दिला.