गडचिरोली : आत्महत्या करण्यासाठी एका युवकाने शनिवारी संध्याकाळी गडचिरोली शहरालगतच्या कठाणी नदीवरील पुलावरून खाली उडी मारली. पण तो पाणी कमी असलेल्या भागात पडला. जखमी अवस्थेत तो नदीपात्रात पडून असताना गडचिरोली पोलिसांनी एसडीआरएफ चमुच्या मदतीने अंधारात शोध घेऊन त्याला बाहेर काढले आणि रुग्णालयात भरती करून त्याचा जीव वाचवला.
हा थरार शनिवारी संध्याकाळी कठाणी नदीच्या मोठ्या पुलाजवळ घडला. आत्महत्येचा प्रयत्न करणारा तो युवक शहरातील गोकुळनगरातील रहिवासी असून त्याचे नाव प्रितम असल्याचे सांगण्यात येते.
प्रितमने मोठ्या पुलावरून नदीपात्रात उडी घेतली. यावेळी कोणीतरी त्याला पाहिले. त्यामुळे पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. नदीपात्रात उडी मारताच प्रितम पात्रातील रेतीवर पडला होता. गडचिरोली ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी तत्परता दाखवत राज्य आपत्ती प्रतिसाद चमुला (एसडीआरएफ) माहिती दिली आणि पोलिसांची चमु लगेच कठाणी नदीकडे रवाना झाली. अंधार पडलेला असल्याने बॅटरीच्या उजेडात आणि मोटारबोटने जाऊन पथकाने प्रितमला नदीपात्रातून बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्याने आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.