महागड्या जंगली मशरूमला गडचिरोलीकर खवय्यांची पसंती

100 रुपयाला मिळते एक जुडी

गडचिरोली : पंधरवड्यापूर्वी जवळपास आठवडाभर झालेल्या जोरदार पावसानंतर जंगलात नैसर्गिकरित्या मशरूम उगवले आहेत. गेल्या आठवडाभरापासून गडचिरोलीच्या बाजारात या मशरूमने चांगलाच भाव खाल्ला आहे. काही दिवस थोडे भाव कमी झाल्यानंतर पुन्हा भाव वाढले असून 100 रुपयाला एक जुडी मिळत आहे.

भरपूर प्रोटिनयुक्त आणि मांसाहाराला पर्याय म्हणून चविष्ट भाजीसाठी खवय्ये मशरूमला पसंती देत आहेत. हे जंगली मशरूम विशिष्ट दिवसातच मिळत असल्याने आणि जंगलातील श्वापदांच्या सावटातून स्वत:चा बचाव करत ते आणावे लागत असल्याने त्याची किंमत एवढी जास्त असल्याचे विक्रेते सांगतात.

कळीच्या स्वरूपातील मशरूमला जास्त भाव आणि जास्त मागणी असते. पण ही कळी उमलल्यानंतर फुलाच्या रूपातील मशरूमला कमी मागणी राहते. तरीही अनेक विक्रेते दोन पैसे मिळण्याच्या आशेने जीव धोक्यात घालून जंगलातून हे मशरूम आणतात.