देशी कट्ट्याचा धाक दाखवत ट्रकचालकांना लुटणारे जेरबंद

2 देशी कट्टे व 11 काडतूस जप्त

गडचिरोली : छत्तीसगडच्या सीमेकडील सावरगाव-मुरुमगाव मार्गावर ट्रक चालकास बंदुकीचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. त्यात एका छत्तीसगडी आरोपीसह गजामेंढी (ता.धानोरा) येथील तिघांचा समावेश आहे. त्यांच्याकडून 2 देशी कट्टे (बनावट पिस्तुल) आणि 11 काडतूत, चोरीला गेलेला मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रानुसार, चार दिवसांपूर्वी ट्रक चालक रामभरोस सीताराम हा सावरगाव-मुरुमगाव रोडवर ट्रक चिखलात फसल्याने रात्री ट्रकच्या कॅबीनमध्ये झोपलेला होता. मध्यरात्री 1.30 ते 2 वाजताच्या दरम्यान तीन अनोळखी व्यक्तींनी रामभरोस याला कॅबीनमधून उठवून बंदुकीचा धाक दाखवत ट्रकमधून डिझेल काढून देण्यासाठी धमकी दिली. परंतु डिझेल काढता न आल्याने आरोपींनी छातीवर व डोक्यावर दोन बंदुका ठेवून जबरीने मोबाईल काढून घेतला. कोणाला सांगितल्यास जिवे ठार मारण्याची धमकी देऊन ते पसार झाले.

ट्रक चालकाने पोलीस स्टेशन मुरुमगाव येथे दिनांक 21 जुलै 2025 रोजी तक्रार दिली. त्यानुसार कलम 309 (4), 311, 351 (3) भान्यासं, सहकलम 3, 25 शस्त्र अधिनियम 1959 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी तातडीने तपास करण्याचे आदेश सावरगाव पोलिसांना दिले होते. पोमकें सावरगाव येथील पोउपनि. विश्वंभर कराळे आणि पोलीस पथकाने तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने व साक्षीदारांच्या जबाबावरून मौजा गजामेंढी ता.धानोरा येथून तीन संशयीत आरोपींना ताब्यात घेतले. त्यात अशोक सुखराम बोगा (30 वर्षे), घुमनसाय बैजुराम गावडे (33 वर्षे) आणि सुकालु आसाराम कोमरा (32 वर्षे) यांचा समावेश आहे.

यादरम्यान आरोपींनी गुन्हा कबूल करत गुन्ह्रात वापरलेल्या दोन्ही बंदुका छत्तीसगड राज्यातील बसंतकुमार कल्लो याने दुरुस्तीसाठी त्यांच्याकडे दिल्या असल्याचे सांगितले. यावरुन गडचिरोली पोलिसांनी बसंतकुमार कल्लो (41 वर्षे), रा.नवागाव कोंडल, ता. दुर्ग, जि.कांकेर (छत्तीसगड) यालाही अटक केली. न्यायालयाने त्या चारही आरोपींना 26 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी धानोरा जगदिश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोमकें सावरगावचे प्रभारी अधिकारी पोउपनि. विश्वंबर कराळे, पोउपनि. राजेंद्र कोळेकर, हवालदार वानखेडे, नायक तुलावी, अंमलदार काळबांधे, श्रीरामे, लेकामी व करसायल यांनी केली.