
अहेरी : तालुक्यातील जिमलगट्टाजवळील पत्ती गाव या गावातील सुरेश वेलादी यांच्या घराला अचानक आग लागून घराने चांगलाच पेट घेतला. हे घर कुडाचे आणि सिंदीच्या पानाने आच्छादलेले असल्याने आगीचा भडका वाढला आणि घरातील संसारोपयोगी वस्तू, साहित्य, घरकुलासाठी मिळालेले 30 हजार रुपये जळून खाक झाले. या घटनेची माहिती मिळताच अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम आणि डॅा.मिताली आत्राम या दाम्पत्याने तिकडे धाव घेत वेलादी कुटुंबाला आर्थिक मदत आणि संसारोपयोगी साहित्य देऊन मोठा आधार दिला.

सुरेश वेलादी व त्यांचे कुटुंबीय धान रोवणीच्या कामासाठी शेतावर गेले असताना ही दुर्घटना घडली. घरी सायंकाळी परतले असता घराला आग लागली होती. ढोलीत भरून ठेवलेले धान आणि अन्य वस्तूही आगीत सापडल्याने फार मोठे नुकसान झाले. पीडित कुटुंबीयांचे जळालेल्या घरालगत घरकुलाचे काम सुरू असून घरी सुरक्षितरित्या ठेवण्यात आलेले सिमेंटच्या बॅग पावसामुळे पूर्णतः खराब झाल्या.
पत्तीगावला जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने जिमलगट्टाजवळील किष्टापूर आणि तेथून तब्बल पाच किलोमीटर हर्षवर्धनबाबा आत्राम, डॉ.मिताली आत्राम यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पायी पत्तीगावला पोहोचून मदत पोहचविले. तब्बल पाच किलोमिटर चिखल तुडवत जाऊन त्यांनी पीडित कुटुंबीयांची मदत करत त्यांना धीर दिल्याने त्या कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी युवा नेते हर्षवर्धनबाबा यांनी तलाठी देविदास लेकामी यांना नुकसान झालेल्या घराचा तात्काळ पंचनामा करण्याची सूचना करत नुकसानग्रस्त कुटुंबियांना शासनाकडून नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष रियाज शेख, सुरेंद्र अलोने, रतन दुर्गे, जाफर अली, मोसीन शेख, अयान पठाण आदी उपस्थित होते.
































