जिल्हा सामान्य रूग्णालयात दिव्यांगांची हेळसांड थांबवा

कुणाल पेंदोरकर यांची मागणी

दिव्यांग प्रमाणपत्र वाटप कक्षासमोर बेंच नसल्याने असे खाली बसावे लागते.

गडचिरोली : जिल्हाभरातील दिव्यांग नागरिक आरोग्यविषयक समस्या आणि दिव्यांगांचे दाखले मिळण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात येत असतात. परंतू त्यांना बसण्यासाठी साधा बेचही तिथे नसल्याने जमिनीवरच बसावे लागते. दिव्यांगांची ही हेळसांड थांबवा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा असंघटीत कामगार कर्मचारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर यांनी आरोग्य प्रशासनाला दिला आहे.

पेंदोरकर यांनी म्हटले की, शासनाच्या वतीने दिव्यांगांसाठी विविध लाभाच्या योजना राबविण्यात येत आहेत. त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्राची गरज असते. अपंग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दिव्यांगांना त्रास सहन करावा लागतो. कधीकधी तर प्रमाणपत्रासाठी अनेक चकरा माराव्या लागतात. हे लक्षात घेऊन तालुका व जिल्हास्तरावर प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हयाच्या विविध भागातून दिव्यांग नागरिक येतात. डॉक्टरांकडून तपासणी केल्यानंतर त्यांना दिव्यांग प्रमाणपत्रासाठी सुचीत केले जाते. त्यानुसार जिल्हा सामान्य रूग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र वितरण विभाग सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी दिव्यांगांना बसण्यासाठी बाकाचीही सोय नाही. त्यामुळे प्रमाणपत्र वितरण कक्षासमोरच ते खाली बसतात. ही हेळसांड दूर करून दिव्यांगांना बसण्यासाठी योग्य ती सोय करावी, अशी मागणी कुणाल पेंदोरकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली आहे.