गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात केंद्रीय विद्यालयासह अभियांत्रिकी महाविद्यालय व अतिरिक्त नवोदय विद्यालय स्थापन करण्याची मागणी खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे केली. त्यांनी संसद भवनातील कार्यालयात प्रधान यांची भेट घेऊन ही मागणी करत निवेदन दिले.
गडचिरोली हा महाराष्ट्रातील एक अतिदुर्गम, आदिवासीबहुल जिल्हा असून, येथील मुलभूत शैक्षणिक सुविधा अत्यंत अपुऱ्या आहेत. जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी शिक्षणाकरीता दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जातात . परिणामी त्यांच्यावर आर्थिक, मानसिक व सामाजिक ताण निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालय यांसारख्या राष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संस्थांची गडचिरोली जिल्ह्यात नितांत गरज आहे. त्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, तसेच ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक क्षमतेचा विकास होईल. त्याचप्रमाणे, गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नसल्यामुळे, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना नागपूर, चंद्रपूर किंवा इतर जिल्ह्यात जावे लागतो. हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोठे आव्हान ठरते. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यामध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापन केल्यास, स्थानिक तरुणाईला त्यांच्या जिल्ह्यातच उच्च शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होईल, अशी मागणी खासदार डॉ.किरसान यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही मागणी गांभीर्याने ऐकून घेतली. लवकरच या मागण्यांवर केंद्र सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास खासदार डॉ.नामदेव किरसान यांनी व्यक्त केला.